

सिडको : सिडकोत अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करून घरातील चोरीमध्ये ३ लाख ९ हजार ३६४ रुपये किमतीचे सोन्याचे वेढा, गोफ, गोल्ड वायर तसेच रोख रक्कम असलेली स्टीलची पेटी चोरून नेली आहे.
फिर्यादी दिपाली पंडित भदाने (वय ४४, रा. सिडको) यांनी दिलेल्या माहितीनुसार, ता. १८ रोजी त्यांनी सोन्याचे दागिने असलेली स्टीलची पेटी काढून किचनच्या ओट्यावर ठेवली होती. त्यावेळी त्यांचे पती घरात झोपलेले होते. दुपारी सव्वा बाराच्या सुमारास ते त्यांची मुलगीसह बाजारात जोडवे घेण्यासाठी गेले होते. दुपारी अडीचच्या सुमारास ती घरी परतली.
दरम्यान, ता. १९ रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास स्टीलची पेटी जागेवर नसल्याचे निदर्शनास आले. याबाबत घरातील सदस्यांकडे चौकशी केली असता पेटी बघितली नसल्याचे स्पष्ट झाले. अज्ञात इसमाने लबाडीने घरात प्रवेश करून सोन्याचे दागिने व रोख रक्कम असलेली पेटी चोरून नेल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या चोरीमध्ये ३ लाख ९ हजार ३६४ रुपये किमतीचे सोन्याचे वेढा, गोफ, गोल्ड वायर तसेच रोख रक्कम लंपास करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. अंबड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.