नाशिक : सकाळच्या सुमारास शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थिनींसमोर विकृत कृत्य करणाऱ्या संशयिताला सरकारवाडा पोलिसांनी पकडले. पवन बैजनाथ प्रजापती (३२, रा. खुटवडनगर, सिडको) असे या संशयिताचे नाव आहे. त्याच्याविरोधात पोक्सोसह विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गंगापूर रोडवरील केबीटी सर्कल, पंडित कॉलनी परिसरात गत आठवड्यात विनयभंगाचे प्रकार घडले होते. नेहमीप्रमाणे सकाळी 7 ते 8 च्या सुमारास विद्यार्थिनी महाविद्यालये - शिकवणीला जात होत्या. त्यावेळी दुचाकीवरून आलेला विकृत संशयित या मुलींसमोर थांबून अश्लील कृत्य केले. त्यामुळे विद्यार्थिनी घाबरल्या. त्यांनी त्याकडे दुर्लक्ष करीत पुढे गेल्या तसेच संशयिताच्या दुचाकीचा क्रमांक लक्षात ठेवला. त्यानंतर पीडितांनी ही बाब क्लासच्या शिक्षकांना सांगितली. सखोल तपासात असाच प्रकार इतर दोन विद्यार्थिनींबरोबरही घडल्याचे उघडकीस आले. त्यामुळे मुलींच्या पालकांसह शिक्षकांनी सरकारवाडा पोलिसांकडे तक्रार केली. पीडितांनी दिलेल्या एमएच १५ जेपी ०६६१ क्रमांकाच्या दुचाकीस्वाराचा शोध घेण्यास सुरुवात झाली. त्यानुसार संशयित पवन प्रजापतीला पकडले आहे. त्याच्या विरोधात गुन्हा दाखल आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पवनविरोधात यापूर्वी चोरीचा गुन्हा दाखल आहे. तसेच तो सातपूर परिसरात फळ, भाजी विक्रीचा व्यवसाय करतो. सकाळी माल खरेदीसाठी जाण्याच्या बहाण्याने गंगापूर रोडमार्गे जाताना त्याने विद्यार्थिनींसमोर अश्लील कृत्य करून पसार झाला. परिसरातील काही सीसीटींव्हीमध्ये त्याच्या हालचाली कैद झाल्या आहेत.