

नाशिक : युवतीस बळजबरीने रिक्षात बसवून एकाने तिच्यावर दमदाटी करीत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार देवळाली कॅम्प परिसरात घडली. युवतीने आरडाओरड केल्याने तिची सुटका झाली. याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात पीडितेच्या फिर्यादीनुसार, संशयिताविरोधात अपहरण, मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडितेने दिलेल्या फिर्यादीनुसार, संशयित पंकज राजेंद्र गांगुर्डे (२६, रा. हाडोळा, देवळाली कॅम्प) याने सोमवारी (दि. १) दुपारी १२.३० च्या सुमारास अपहरण केले. पीडिता काम करत असलेल्या ठिकाणी पंकज गेला व त्याने बोलण्याच्या बहाण्याने तिला रिक्षात बसवले. मात्र, पीडितेस संशय आल्याने तिने आरडाओरडा केला. त्यामुळे पंकज याने पीडितेस चावा घेत, तोंड दाबून खर्जुळ मळ्याकडे नेले. तेथे रेल्वे रुळावर बळजबरीने नेत उभे केले. तेथेही पीडितेने आरडाओरडा केला. त्यामुळे नागरिकांनी पीडितेची सुटका केली. दरम्यान, संशयित पंकज याने पीडितेचा मोबाइल हिसकावून घेत तिच्या आईला फोन केला. तसेच 'तुझ्या मुलीला रेल्वेखाली ढकलून देतो' असे बोलून फोन कट केला. त्यानंतर तो तेथून पसार झाला. याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलिस तपास करीत आहेत.