

नाशिक : रक्षकच भक्षक बनल्याचा प्रकार इंदिरानगर पोलिस ठाणे हद्दीत उघडकीस आला. एका विवाहित शिक्षकेला फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची तसेच जीवे मारण्याची धमकी देत नाशिक पोलिस आयुक्तालयातील दंगल नियंत्रण पथकाच्या शिपायाने शिक्षिकेचे लैगिंक शोषण केले. याप्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, संशयितास बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.
नाशिक पोलिस आयुक्तालयातील दंगल नियंत्रण पथकातील शिपाई संशयित अभी ऊर्फ चंद्रकांत दळवी याची पीडित शिक्षिकेची २०२० मध्ये ओळख झाली होती. तेव्हा दळवी हा इंदिरानगर पोलिस ठाण्यात कॉन्स्टेबल होता. पीडितेच्या घरातील लोकांसोबत दळवी यांचे कौटुंबिक संबंध निर्माण झाल्याने त्याने या ओळखीचा गैरफायदा घेतला. संशयिताने बळजबरीने लॉजमध्ये नेऊन पीडितेसोबत शारिरीक संबंध प्रस्थापित केले. पीडितेने घरच्यांपासून लपवून दळवी याच्याशी विवाहही केला. नंतर दळवी याने माझ्या कुटुंबियांचा विवाहास विरोध असल्याचे सांगत पुन्हा एकत्र राहण्यास विरोध केला. बरेच दिवस झाल्यानंतर दळवी हा पीडितेशी केवळ शारीरिक संबंध ठेवण्यापुरता संपर्क करू इच्छित होता. त्याने पीडितेला मोबाइलद्वारे तसे मेसेजही पाठविले. मात्र, पीडित शिक्षिकेने त्यास विरोध केला असता, दोघांचे जुने फोटो व्हायरल करण्याची तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच तो पीडितेचा पाठलाग करून तिला रस्त्यात गाठत असे. पीडितेच्या विवाहानंतरही संशयित पोलिस शिपाई दळवी याने त्रास देणे सुरूच ठेवले. त्याला कंटाळून इंदिरानगर पोलिस ठाण्यात तक्रारीनंतर दळवी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, याप्रकरणी दळवी याला अटक करण्यात आली असून, या प्रकरणाची सध्या शहरात एकच चर्चा रंगत आहे.