Nashik Crime News | पर्यटकांना विमानतळावर सोडून ट्रॅव्हल एजंट फरार

Nashik trip agony : सहलीचा आनंद दूरच, मनस्तापच अधिक; एजंटकडून ३६ जणांची फसवणूक
Nashik Crime News | पर्यटकांना विमानतळावर सोडून ट्रॅव्हल एजंट फरार

नाशिक : मनाली येथे पर्यटनासाठी नेत एजंटने शहरातील ३६ पर्यटकांची आर्थिक फसवणूक केली. त्यांचे विमान तिकीट, बस भाडे, हॉटेलचे पैसे न भरता एजंटने पळ काढल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात पर्यटकांनी संशयित राजीव मदनलाल चंदा (४०, रा. ओमकार हाइट, इंदिरानगर) याच्याविरोधात फसवणुकीची फिर्याद दाखल केली आहे. (travel agent abandoned Tourists at Manali)

Summary

संपूर्ण सहलीचा येणारा खर्च पर्यटकांनी स्वतः करीत अखेर नाशिक गाठले असून, संशयित ट्रॅव्हल एजंटविरोधात पावणे चार लाखांची फसवणूक केल्याचा गुन्हा अंबड पोलिसात दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुभांगी हेमंत बडगुजर (रा. कामटवाडे) यांच्या फिर्यादीनुसार, संशयित राजीव चंदाने दि. १२ जानेवारी ते १५ फेब्रुवारी दरम्यान गंडा घातला. शुभांगी यांच्यासह शहरातील ३५ जणांनी नाशिक ते कुलू मनाली व तेथून पुन्हा नाशिक अशा सहलीसाठी राजीव यांच्याशी संपर्क साधला होता. त्यानुसार त्याने सहलीला नेण्यासाठी हॉटेल, बस, विमान तिकीट, जेवणाचा खर्च यांसाठी पाच लाख ३३ हजार रुपये घेतले होते. त्यानंतर पर्यटकांना चंदिगड विमानतळापर्यंत नेले. तेथून बुकिंग असलेल्या हॉटेलमध्ये पर्यटक गेले असता, तेथे बुकिंगची रक्कम भरली नसल्याचे उघडकीस आले. त्यामुळे पर्यटकांनी राजीवशी संपर्क साधला असता त्याने, 'माझ्याकडून पैसे ऑनलाइन जात नसल्याने तुम्ही भरा. मी तुम्हाला परत देतो.' असे सांगितले. त्यामुळे पर्यटकांनी त्यांच्याकडील पैसे भरून हॉटेल बुक केले. त्यानंतर मनालीत फिरण्यासाठी दोन बस ठरवल्या होत्या, त्यांचेही पूर्ण पैसे दिले नसल्याचे पर्यटकांच्या लक्षात आले. त्यावेळीही राजीवने पेमेंट होत नसल्याचे कारण सांगून पर्यटकांना पैसे भरण्यास सांगितले. (travel agent abandoned Tourists at Manali)

संपूर्ण सहल झाल्यानंतर परतीचा प्रवास सुरू केल्यावर ३६ पैकी १२ प्रवाशांचे परतीचे विमान तिकीट राजीवने काढले नसल्याचे उघड झाले. त्यामुळे पर्यटक आणि राजीवमध्ये वाद झाला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर पर्यटकांनी संताप व्यक्त केला. संशयिताने तेथून पळ काढला. दरम्यान, प्रवासात झालेला तीन लाख ६५ हजार रुपयांचा खर्च परत द्यावा, अशी मागणी पर्यटकांनी केली. मात्र त्याने पैसे देण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे पर्यटकांनी अंबड पोलिसांकडे धाव घेत राजीवविरोधात तक्रार दिली. याप्रकरणी अंबड पोलिस अधिक तपास करीत आहेत.

सहलीत आनंदाऐवजी मनस्ताप

१२ प्रवाशांची परतीची विमान तिकिटे नसल्याने पर्यटकांचे विमान निघून गेले. त्यामुळे ३६ पर्यटकांना पुन्हा विमान तिकिटे काढून नाशिकला यावे लागले. मुंबईला उतरल्यानंतर तेथूनही प्रत्येकाने अतिरिक्त खर्च करून नाशिक गाठले. त्यामुळे सहलीत आनंदाऐवजी मनस्ताप सहन करावा लागल्याची भावना या पर्यटकांची झाली होती.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news