निफाड (नाशिक): निफाड तालुक्यातील थडी सारोळे येथे वृद्ध शेतकऱ्याला डिझेल टाकून जाळून मारल्याच्या प्रकरणातील तीनही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.
निफाडचे पोलीस उपविभागीय अधिकारी डॉ. निलेश पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक ईश्वर पाटील, उपनिरीक्षक आनंद पटारे यांच्या पथकाने आरोपींच्या अटकेसाठी विशेष परिश्रम घेतले. थडी सारोळे येथील ८० वर्षीय शेतकरी कचेश्वर उर्फ कचरू नागरे आणि त्याच्या भावात वडिलोपार्जीत विहीरीवरून वाद होता.
कचेश्वर नागरे हे मंगळवारी (दि.९) शेतातील घराजवळ साफसफाई करीत असताना त्यांचा सख्खा धाकटा भाऊ चांगदेव आणि त्याची रवींद्र आणि निलेश ही दोन मुले या तिघांनी कचेश्वर यांच्या अंगावर डिझेल टाकून पेटवून दिले, अशा आशयाची तक्रार निफाड पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आलेली होती. या प्रकरणात कचेश्वर नागरे हे मोठ्या प्रमाणात भाजले गेल्यामुळे वैद्यकीय उपचार सुरू असताना मृत्युमुखी पडले. गुन्हा घडल्यानंतर आरोपी पसार झाले होते. पोलिस पथकाने गुरुवारी (दि. ११) नांदूर मधमेश्वर शिवारातील गोदावरी नदीकाठ पिंजून काढत त्यांना शोधले आणि ताब्यात घेतले. आरोपींची वैद्यकीय तपासणी आणि इतर तांत्रिक पूर्तता पूर्ण करून आज (दि. १२) त्यांना न्यायालयासमोर हजर केेले जाण्याची शक्यता आहे.