Nashik Crime News | सिन्नरला चाकूने वार करत लूटणाऱ्या दरोड्याची तीन दिवसांत उकल

एमआयडीसी पोलिस, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; सहा जणांना अटक
सिन्नर, नाशिक
सिन्नर : दरोड्यातील संशयित आरोपींना मुद्देमालासह ताब्यात घेतलेले एमआयडीसी व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस.(छाया : संदीप भोर)
Published on
Updated on

सिन्नर : शहरातील एक नामांकित कंपनीचा माल व अन्य व्यावसायिकांची रोकड व चेक बँकेत जमा करण्यासाठी दुचाकीवरून नाशिकला जात असलेल्या एका खासगी कंपनीच्या सेवकावर अज्ञात लुटारूंनी चाकूने वार करत सुमारे साडेसात लाखांची रोकड लुटून धूम ठोकल्याची खळबळजनक घटना सोमवारी (दि. २९) दुपारी १२.४५ च्या सुमारास घडली होती. तथापि, एमआयडीसी पोलिसांकडून तीन दिवसांत या धाडसी दरोड्याची उकल केली असून, सहा संशयित आरोपींच्या मुसक्या आवळत मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. तथापि, दोन जण अद्यापही फरार असून, पोलिस त्यांचा शोध घेत आहे.

फिर्यादी सागर नंद चौधरी हे रेडियन्ड कॅश मॅनेजमेंट लि. चेन्नई या कंपनीच्या पुणे शाखेमध्ये कॅश एक्झिक्युटिव्ह म्हणून नोकरीस असून, त्यांच्याकडे कंपनीचे सिन्नर तालुक्याचे क्षेत्र आहे. लुटीच्या घटनेनंतर त्यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. जिल्हा पोलिस अधीक्षक विक्रम देशमाने, अपर पोलिस अधीक्षक आदित्य मिरखेलकर, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. नीलेश पालवे यांच्या सूचनेनुसार आरोपींचा शोध घेण्यासाठी पथके नेमण्यात आली होती. सखोल तपासात पळसे येथील अमोल ओढेकर, शुभम पवार व त्याच्या मित्रांनी गुन्हा केला असल्याचे निष्पन्न झाले.

पोलिसांनी अमोल अरुण ओढेकर (रा. शिंदेगाव, ता. जि. नाशिक), शुभम विजय पवार (रा. पळसे, ता. जि. नाशिक) यांना ताब्यात घेऊन त्यांचेकडे चौकशी केली असता सुरुवातीस त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. तथापि, नंतर साथीदार महेश सतीश पठारे (रा. विंचूर, ता. निफाड), गौरव प्रभाकर भवर (रा. मानोरी खुर्द, ता. निफाड), सागर एकनाथ चव्हाण (रा. विंचूर, ता. निफाड), प्रसाद आनंदा गायकवाड (रा. मानोरी बु, ता. येवला), गणेश रमेश गायकवाड (रा. मानोरी खुर्द, ता. निफाड) सूरज प्रकाश पाकळ (रा. शिर्डी, ता. राहता) आदींच्या मदतीने दोन मोटारसायकल व मारुती इर्टिगा कार वापरून केल्याची माहिती देत गुन्ह्यातील ७ लाख ७३ हजार रोख रक्कम आठ जणांमध्ये वाटून घेतल्याची कबुली दिली. त्यानंतर सदर आरोपींकडून गुन्ह्यातील गेलेली रोख रक्कम व वाहनासह एकूण ७ लाख, ७९ हजार रुपयांची रिकव्हरी करण्यात आली असल्याची माहिती पालिसांनी दिली.

सिन्नर, नाशिक
सिन्नर : दरोड्यातील संशयित आरोपींना मुद्देमालासह ताब्यात घेतलेले एमआयडीसी व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस.(छाया : संदीप भोर)

याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राजू सुर्वे यांच्या मार्गदर्शानाखाली एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक यशवंत बाविस्कर, पोलिस उपनिरीक्षक किशोर पाटील, अंमलदार भगवान शिंदे, योगेश शिंदे, नवनाथ चकोर, प्रकाश उंबरकर, प्रशांत सहाणे, जयेश खाडे तसेच तांत्रिक विश्लेषण विभाग नाशिक ग्रामीणकडील प्रदीप बहिरम, हेमंत गिलबिले अशांनी सदर गुन्हा उघडकीस आणला आहे. पोलिस उपनिरीक्षक किशोर पाटील हे गुन्ह्याचा पुढील तपास करीत आहेत.

पाळत ठेवून केली लूट

पोलिसांनी नाशिक-सिन्नर रोडवरील सीसीटीव्ही तपासले. सीसीटीव्हीमध्ये फिर्यादीचा पाठलाग करताना कोणीही दिसून आले नाही. त्यामुळे आरोपी हे फिर्यादी नेहमी पैसे घेऊन जातात. याबाबत माहिती असलेले असावे तसेच ते मोहदरी घाटात फिर्यादी येण्याची वाट पाहत थांबून असावे, अशी शक्यता वाटल्याने त्याबाबत चौकशी सुरू केली. गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की सदरचा गुन्हा हा पळसे येथील अमोल ओढेकर, शुभम पवार व त्याच्या मित्रांनी केला असल्याचे निष्पन्न झाले.

संशयित सराईत गुन्हेगार

संशयित आरोपी महेश सतीश पठारे याच्यावर लासलगाव पोलीस ठाणे येथे आर्म अक्ट व मारहाण असे वेगवेगळे गुन्हे दाखल आहे. तसेच सुरज प्रकाश पाकळ याचेवर अहमदनगर जिल्ह्यात फसवणूक करणे, मारहाण करणे अशा प्रकारचे गुन्हे दाखल आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news