

नाशिक : डिजिटल अरेस्टची धमकी देत ८५ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाची तब्बल ६६ लाख ४७ हजार १४२ रुपयांची ऑनलाइन फसवणूक केल्याची धक्कादायक घटना नाशिक शहरात घडली आहे. या प्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात दोन अज्ञात इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी हे एका खाजगी कंपनीतून सेवानिवृत्त झालेले आहेत. त्यांना अज्ञात व्यक्तींनी व्हिडिओ कॉलद्वारे संपर्क साधला. त्या इसमांनी स्वतःला मुंबई पोलिस असल्याचे सांगून, तुम्ही टेररिस्ट फंड आणि मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात सहभागी आहात, आमच्याकडे त्याचे पुरावे आहेत, असे सांगितले. तसेच तुमच्यावर डिजिटल अरेस्टची कारवाई सुरू आहे, त्यामुळे तुम्ही कोणाशीही संपर्क साधायचा नाही, असे धमकावले.
डिजिटल अरेस्ट असा काही प्रकार अस्तित्वात नाही. त्यामुळे नागरिकांनी अशा कॉल्सला प्रतिसाद देऊ नये तात्काळ पोलिस विभागाशी संपर्क साधावा.
संजय पिसे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सायबर पोलिस ठाणे
या धमकीमुळे घाबरलेल्या ज्येष्ठांनी कोणालाही काही न सांगता समोरील व्यक्तींनी सांगितल्याप्रमाणे सर्व निर्देश पाळले. या कालावधीत २५ ऑक्टोबर ते ७ नोव्हेंबर दरम्यान संशयितांनी फिर्यादीकडून ६६ लाख रुपयांहून अधिक रक्कम ॲक्सिस बँक आणि बँक ऑफ बडोदातील खात्यांमध्ये ट्रान्सफर करून घेतली.
यानंतर संशयितांनी फिर्यादींसोबतचा संपर्क तोडला. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी तत्काळ नाशिक सायबर पोलिस ठाण्यात धाव घेतली आणि तक्रार नोंदविली. या प्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय पिसे करत आहेत.