Nashik Crime News | भितीदायक...! शहरात शस्त्रांचा सर्रासपणे वाढतोय वापर

चौकाचौकांतील तथाकथित भाई: क्षुल्लक कारणांवरून मारहाणीचे वाढताहेत प्रकार
Nashik crime
Nashik Crime file photo
Published on
Updated on

नाशिक : शहरात दाखल गुन्ह्यांनुसार क्षुल्लक कारणांवरून एकमेकांना मारहाण करण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे खून, खुनाचा प्रयत्न, मारहाणीच्या गुन्ह्यांत वाढ झाल्याचे चित्र आहे. शहरातील पोलिस ठाण्यांमध्ये सोमवारी (दि.५) प्राणघातक हल्ल्याप्रकरणी एक तर मारहाणीचे सहा गुन्हे दाखल आहेत. त्यातच वाद मिटवण्यासाठी सामजंस्याऐवजी धारदार शस्त्रांसह मिळेल त्या शस्त्रांचा वापर करण्याचा ट्रेंड शहरात वाढल्याचे वास्तव समोर येत आहे. (There has been an increase in beating each other for minor reasons in the city.)

'आमच्याविरोधात पोलिसांकडे तक्रार का केली'

सिन्नर फाटा येथे जमिनीच्या वादातून दोघांनी मिळून एका युवकास रॉडने मारहाण करीत त्याचा खून केला. त्याचप्रमाणे मागील वादातून किंवा क्षुल्लक कारणांवरून एकमेकांवर हल्ले करण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे शहरातील गुन्हेगारीत वाढ होत असल्याचे चित्र आहे. पहिल्या घटनेत पंचवटीतील लक्ष्मणनगर परिसरातील गायत्री माता मंदिरासमोर आठ ते नऊ जणांच्या टोळक्याने दोघांवर प्राणघातक हल्ला केल्याची घटना रविवारी (दि. ४) रात्री ११ वाजता घडली. किरण सुभाष जाधव (४२, रा. राहुलवाडी) यांच्या फिर्यादीनुसार, संशयित उदय सुनील चारोस्कर (२०, रा. भगरे गल्ली, पेठ रोड), अंकुश ऊर्फ पब्या अरुण गायकवाड, बाबू यादव, योगेश प्रकाश यंदे, राहुल शिवाजी शिंदे, खेमकुमार अजय यादव व इतर दोघे (सर्व रा. पेठ रोड) यांनी प्राणघातक हल्ला केला. 'आमच्याविरोधात पोलिसांकडे तक्रार का केली', अशी कुरापत काढून संशयितांनी विजय कराटे यांच्यासोबत वाद घातला. त्यामुळे किरण जाधव यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता संशयितांनी किरण यांच्यासह गौरव अरुण रोकडे व आकाश भाऊसाहेब वाकचौरे यांनाही शिवीगाळ करीत मारहाण करून कोयत्याने वार करून प्राणघातक हल्ला केला. या प्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात टोळक्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कुरापत काढून मारहाण

दुसऱ्या घटनेत साई सुधीर पाटील (१९, रा. अमृतधाम) याच्या फिर्यादीनुसार, संशयित वेदांत वाघ, सिद्धार्थ ऊर्फ भुऱ्या हेबांडे (दोघे रा. अमृतधाम) यांनी कुरापत काढून रविवारी (दि.४) रात्री मारहाण करीत दुखापत केली. या प्रकरणी आडगाव पोलिस तपास करीत आहेत.

तिसऱ्या घटनेत साहिल रंजित सावळे (२६, रा. गजानन चौक, पंचवटी) यांच्या फिर्यादीनुसार, संशयित गणेश भास्कर साळवे (२६), उदय जयंत जगताप (२८, दोघे रा. पंचवटी) यांनी रविवारी (दि.4) रोजी रात्री पंचवटीतील कृष्णनगर परिसरात कुरापत काढून मारहाण करीत दुखापत केली. या प्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

'दुचाकी हळू चालवा' सांगितले... म्हणून आला राग

चौथ्या घटनेत 'दुचाकी हळू चालवा' असे सांगितल्याचा राग आल्याने दुचाकीस्वार तिघांनी मिळून संकेत भगवान हेमाडे (२६, रा. पेठ रोड) यांना मारहाण करीत गंभीर दुखापत केली. रविवारी (दि.4) रोजी रात्री ९ वाजता वावरे लेन येथे हा प्रकार घडला. दुचाकीस्वार संशयितांनी संकेत यांना धारदार शस्त्राने वार करून गंभीर दुखापत केली. या प्रकरणी भद्रकाली पोलिस तपास करीत आहेत.

पाचव्या घटनेत गौळाणे रोडवर हॉटेल रानवारा येथे तीन वेटर व काउंटरवरील व्यक्तीने ग्राहकास बेदम मारहाण केल्याची घटना रविवारी (दि.4) रोजी सायंकाळी घडली. या प्रकरणी दशरथ संतू खकाळे (३५, रा. पाथर्डी फाटा) यांच्या फिर्यादीनुसार, इंदिरानगर पोलिस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सहाव्या घटनेत देवळाली गावात ऋषिकेश आबा पवार, अनिकेत देवरे, ध्रुव म्हस्के यांनी यज्ञेश ज्ञानेश्वर शिंदे (२४, रा. देवळाली गाव) यास कोयत्याने वार करून गंभीर दुखापत केली. या प्रकरणी नाशिक रोड पोलिस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्हेगारीवर नियंत्रण आणण्याची मागणी

शहर परिसरातील चौकाचौकांतील तथाकथित भाई यांच्यातील किरकोळ वाद, परिसरात दहशत निर्माण करणे, खंडणी वसुली यांसह विविध कारणांतून हाणामाऱ्यांचे प्रकार घडत आहे. या हाणामारीत टोळक्यांकडून धारदार शस्रांसह कट्ट्यांचाही वापर केला जात असल्याने या गुन्हेगारीवर नियंत्रण आणण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news