पंचवटी : विशेष धार्मिक महत्त्व असलेल्या पंचवटी परिसरात देह विक्रीचे रॅकेट सुरु असल्याचे उघड झाले असून पुणे येथील एका सामाजिक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी याबाबत तक्रार केल्यानंतर पंचवटी पोलिसांना दूर ठेवत हा अड्डा उध्वस्त करण्यात आला आहे. या कारवाईमध्ये पश्चिम बंगाल, गुजरात आणि झारखंड येथील महिलांची सुटका करण्यात आली असून लॉज मालक आणि मॅनेजर विरोधात अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कायद्यान्वये पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, प्रोग्राम असोसिएटस, फ्रिडम फर् पुणे या संस्थेचे पदाधिकाऱ्यांकडून नाशिकमध्ये पंचवटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत महिलांकडून बळजबरीने देहविक्री करून घेत असल्याची माहिती मिळाली होती. याबाबत त्यांनी शुक्रवार (दि. ११) रोजी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क करून कारवाई करण्याची विनंती केली होती. त्यानुसार वरिष्ठांच्या आदेशानुसार एक पथक तयार करून पंचवटी परिसरातील मुंबई - आग्रा महामार्गावरील हॉटेल मधुबन लॉज येथे पथकाने पोहचत एक बनावट ग्राहक या लॉजमध्ये पाठविला. या बनावट ग्राहकाने देहविक्री सुरु असल्याचा इशारा देताच पथकाने लॉजवर छापा टाकण्यात आला. यावेळी याठिकाणी पश्चिम बंगाल, गुजरात आणि झारखंड येथून आणलेल्या महिलांना ताब्यात घेतले असून वरवंडी, ता. दिंडोरी आणि चांदवड येथील दोघा संशयितांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पीडित महिलांना लॉज मालक संशयित प्रवीण खर्डे यांनी आपल्याला साफसफाईच्या कामासाठी आणल्याचे सांगितले. मात्र, आम्ही परराज्यातील असल्याचा गैरफायदा घेत साफसफाईचे काम न देता आमच्याकडून देहविक्रीचा व्यवसाय करून घेत होते. तसेच, आम्ही पळून जाण्याचा प्रयत्न केला असता आम्हाला जीवे मारण्याची आणि बदनामी करण्याची धमकी दिल्याची माहिती महिलांनी दिली. याप्रकरणी संशयित लॉज मालक प्रवीण मधुकर खर्डे, (रा. नाशिक आणि लॉज) मॅनेजर मंटूकुमार सीताराम यादव, (३२, रा. मधुबन लॉजिंग, नाशिक, मूळ रा. काटाटोली, ता. जि. रांची, झारखंड) यांच्याविरोधात पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई सहाय्यक पोलिस आयुक्त गुन्हे शाखा संदीप मिटके, वरिष्ठ पोलिस निरीक्षक आंचल मुदगल, पोलिस उपनिरीक्षक अभिजित पवार, सुवर्णा महाजन, सुनील माळी, सहायक पोलिस उपनिरीक्षक शेरखान पठाण,पोलिस हवालदार दीपक पाटील, पोलिस नाईक अजय गरुड, पोलिस अंमलदार योगेश परदेशी, हर्षल बोरसे, पोलिस हवालदार नीलिमा निकम, अंमलदार स्नेहल सोनवणे यांनी केली.