

चांदवड : मुंबई - आग्रा महामार्गाने अवैध विदेशी मद्याची तस्करी करणारा आयशर ट्रक सोग्रस (ता. चांदवड) येथे राज्य उत्पादन शुल्काच्या भरारी पथकाने सापळा रचून पकडला. कारवाईत विदेशी दारूच्या ५० लाख ८७ हजार ८४० रुपये किमतीच्या एकूण ४०८ बॉक्ससह एकाला अटक करण्यात आल्याची माहिती भरारी पथकाचे अधिकारी निरीक्षक रियाज खान यांनी दिली.
दादरा नगर हवेली व दिव दमण येथेच विक्रीस असलेला विदेशी मद्यसाठा मुंबई - आग्रा महामार्गाने अवैधरीत्या वाहतूक होणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्काच्या भरारी पथकाला मिळाली होती. त्यानुसार सोग्रस येथे पथकाने सापळा रचला. यावेळी संशयास्पद आयशर गतिरोधकावर हळू झाल्यावर पथकाने तो थांबवला. आयशरची झडती घेतली असता, त्यात अवैध मद्याचे ४०८ बॉक्स आढळले. हा सर्व साठा धुळे जिल्ह्यातील पिंपळनेरे येथे जात असल्याची कबुली अटक केलेल्या अप्सरुद्दिन मसिउद्दिन खानने दिली. संशयिताला चांदवड न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यात आंतरराज्यीय टोळी कार्यरत आहे. त्यांचा संपूर्ण तपास निरीक्षक रियाज खान करीत आहेत.
भरारी पथकात खान, दुय्यम निरीक्षक आर. जी. जाधव, जवान रूपेश काळे, वैभव माने, गणेश पडवळे, राजाराम सोनवणे, चांदवडचे गोपाळ चांदेकर, दुय्यम निरीक्षक दिलीप महाले आदींचा समावेश होता.