

नाशिक : 'निमा'सारख्या उद्योजकांच्या प्रतिष्ठित संस्थेचे अध्यक्षपद भूषविलेल्या ज्येष्ठ उद्योजक मधुकर ब्राह्मणकर यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल झाला. २० लाखांच्या खंडणीसाठी त्यांनी तरुण उद्योजकाला जिवे मारण्याची धमकी दिली. त्याच्याकडून एक लाख रुपये खंडणी स्वरूपात घेतल्याची धक्कादायक माहिती फिर्यादीत नमूद करण्यात आली आहे.
सातपूर पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात जय चंद्रकांत मालपुरे (रा. मंडलिकनगर, बापू पुलाजवळ, पाथर्डी) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. जय मालपुरे यांनी नोव्हेंबर २०२३ मध्ये संशयित ब्राह्मणकर यांच्या सातपूर औद्योगिक वसाहतीतील चंद्रशेखर इलेक्ट्रिकल्स या ठिकाणी 'जय सेल्स कॉर्पोरेशन' नावाने गहू आटा मिलनिर्मित लघु उद्योग उभारला होता. यासाठी त्यांनी ब्राह्मणकर यांच्याशी १५ वर्षे रजिस्टर भाडे करारनामा केला होता. मात्र, त्यांच्यात वीज बिलावरून मतभेद झाल्याने ब्राह्मणकर यांनी कंपनीला टाळे लावल्याचा आरोप मालपुरे यांनी केला.
केलेल्या कराराचे उल्लंघन करत संशयित ब्राह्मणकर यांनी साथीदार व्ही. एस. नॅचरल ॲग्रो कंपनीचे सोमनाथ गंगाधर बधान व इतरांसमवेत संगनमत करत कंपनीतील लाखो रुपयांच्या मशिनरी व इतर साहित्य जप्त केले. हे साहित्य परत करण्यासाठी २० लाखांची खंडणी मालपुरेंकडे मागितल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. ७ लाख रुपये किमतीची आटा मिल तयार करणारी मशिनरी, १२ लाख रुपये किमतीचा रेडी आटा, पाच लाख रुपये किमतीचे कंपनीतील इतर साहित्य, ७ लाख ५१ हजार ५० रुपये किमतीचे गहू, कंपनीची मूळ कागदपत्रे, आयसीआयसीआय बँकेचे चेकबुक असा एकूण ८४ लाख ५१ हजार ५० रुपये किमतीचा मुद्देमाल संशयित ब्राह्मणकर आणि त्यांच्या साथीदारांनी चोरून नेला होता. चोरून नेलेल्या आयसीआयसीआय बँकेच्या धनादेशावर खोट्या सह्या करत ते बाऊन्सही केले.
खोट्या तक्रारीची दिली धमकी
फिर्यादीची मशिनरी नष्ट करत फिर्यादीविरुद्ध खोटी तक्रार करतो, अशी धमकी देऊन जय मालपुरे यांच्याकडे २० लाख रुपयांची खंडणी मागितली होती. मधुकर फेब्रुवारी २०२६ मध्ये संशयित ब्राह्मणकरने मालपुरे यांच्याकडून खंडणी स्वरूपात एक लाख रुपये घेतले. मात्र, अद्याप चोरून नेलेले मटेरिअल परत न करता फिर्यादीचे आर्थिक नुकसान केले. दरम्यान, याप्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात संशयित मधुकर ब्राह्मणकर, सोमनाथ बधान व त्यांच्या साथीदारांविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक बुवा अधिक तपास करत आहेत.