

नाशिक : अवैधरित्या परराज्यातून आणलेल्या मद्याची साठवणूक करणाऱ्यास राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने अटक केली आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील ओझरखेड-जव्हार रोडलगत, घोडीपाडा बेरवल याठिकाणी मद्याचा साठा ठेवण्यात आला होता. यावेळी भरारी पथकाने मद्याचा साठा तसेच वाहतुकीकामी वापरलेली दुचाकी जप्त केली आहे.
घोडीपाडा बेरवल याठिकाणी मोठ्या प्रमाणात मद्यसाठा ठेवण्यात आल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार पथकाने धाड टाकत एका कौलारु झापाची तपासणी केली असता, त्याठिकाणी राज्यात विक्रीस प्रतिबंधित असलेल्या विदेशी मद्याचे ९८ बॉक्स आढळून आले. या मद्याची किमत सहा लाख ८३ हजार ६४० रुपये इतकी असून, त्यासह दुचाकी जप्त करण्यात आली आहे. अनिल राजू गोतरणे (२७, रा. घोडीपाडा, बेरवल, ता. त्र्यंबकेश्वर) या संशयितास ताब्यात घेतले आहे.
दरम्यान, हा मद्यसाठा दादरा नगर हवेली याठिकाणी विक्रीसाठी नेला जाणार असल्याची माहिती पथकाला प्राप्त झाली. संशयितावर महाराष्ट्र मद्यनिषेध कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भरारी पथकात निरीक्षक विलास बामणे, दुय्यम निरीक्षक गणेश नागरगोजे, संदीप देशमुख, व्ही. ए. चव्हाण, साागर पवार, दीपक आव्हाड, अमन तडवी, अनिता भांड यांंचा सहभाग होता.