मालेगाव : मुंबई- इंदूर महामार्गावरील चाळीसगाव चौफुलीपासून काही अंतरावर असलेल्या महामार्गाच्या बाजूला दगडाने ठेचून तरुणाची हत्या करण्यात आली होती. मृताची ओळख पटली असून या प्रकरणी एकाला तालुका पोलीसांनी अटक केली आहे.
राशीद अख्तर मोहमद इंद्रिस (२४, रा. नयापुरा) याची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली होती. या घटनेची माहिती तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राहुल खताळ यांना समजाताच त्यींनी पोलीस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. अपर पोलिस अधीक्षक अनिकेत भारती, नितीन गणापुरे यांनी ही घटनास्थळी जाऊन पाहणी केली. यावेळी पोलिसांनी जखमी व्यक्तीला रुग्णवाहिकेतून उपचारासाठी येथील सामान्य रुग्णालयात पाठविले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून त्यास मृत घोषित केले. सुरुवातीला या मृताची ओळख पटत नसल्याने त्या दृष्टीने पोलिसांनी तपास चक्र फिरविले. या खुनाचा तपास सुरू असतानाच अवघ्या काही तासांतच पोलिसांनी गुन्ह्यातील आरोपीला शोधून काढले. खून करून फरार झालेला संशयित आरोपी अब्दुल साकीब अब्दुल कादिर (१९, रा. बिस्मिल्ला बाग, गल्ली नं ४) याला अटक करण्यात तालुका पोलीसांना यश आले.