

पंचवटी (नाशिक ) : मित्रांवर विश्वास ठेवून आर्थिक व्यवहारात गुंतवणूक केलेली लाखो रुपयांची रक्कम मागील अनेक महिन्यांपासून परत मिळत नसल्याने कर्जबाजारी झालेल्या ठेकेदाराने जीवनयात्रा संपविल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सुदर्शन कारभारी सांगळे (५१, रा. हनुमानवाडी) असे मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी पंचवटी पोलिसांनी दोघांविरुद्ध जीवनयात्रा संपविण्यास प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
हनुमानवाडीत राहणाऱ्या सुदर्शन याने दोन दिवसांपूर्वी राहत्या घरात गळफास घेत जीवनयात्रा संपविल्याची घटना घडली होती. सांगळे यांनी जीवनयात्रा संपविण्यापूर्वी स्वतः लिहिलेली चिठ्ठी त्यांच्या खिशात भाचा निखिल आव्हाड यास मिळाली. त्या चिठ्ठीत सांगळे यांनी त्यांचे मित्र असलेले संशयित नवनाथ परसराम टिळे (रा. एकलहरा कॉलनी) व राम किसनराव शिंदे (रा. हिवरखेड, ता. चांदवड) यांची नावे लिहून त्यांच्याकडून कशाप्रकारे आर्थिक फसवणूक झाली याचा उल्लेख होता.
ओंकार उर्फ सचिन कारभारी सांगळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. ठेकेदार सांगळे यांनी त्यांचे मित्र असलेल्या टिळे व शिंदे यांच्या सांगण्यावरून व्यवहारात आर्थिक गुंतवणूक केली होती. अजून पैसे लागत असल्याने त्यांनी ओळखीच्या लोकांकडून सुद्धा काही रक्कम हात उसनवार घेतली होती. टिळे व शिंदे यांनी सांगळे यांच्या नावावर काही सावकारी व्यवसाय करणाऱ्यांकडून व्याजाने रक्कम घेतली होती. त्याचे व्याज सांगळे वेळोवेळी भरत होते, असा आरोप मृताच्या कुटुंबातील सदस्यांनी केला. पोलिसांनी ही चिठ्ठी जप्त केली असून तपास पोलिस उपनिरीक्षक सचिन चव्हाण करत आहेत.