

नाशिक : पंचवटी परिसरात घडलेल्या घरफोडी प्रकरणातील संशयित आरोपींना गुन्हेशाखा युनिट दोनच्या पथकाने अटक केली आहे. त्यांच्याकडून दोन लाख ५० हजार रुपयांची स्कोडा कार जप्त करण्यात आली आहे. संशयितांपैकी एकावर ग्रामीण परिसरातील निफाड, ओझर व सायखेडा पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.
गुन्हेशाखा युनिट दोनचे पोलिस नाईक मनोहर शिंदे, पोलिस शिपाई महेश खांडबहाले यांना क्रांंतीनगर, मखमलाबाद रोड येथे दिवसा घरफोडी करून काही जण विल्होळीजवळील डीमार्टजवळून पाथर्डी गावाच्या दिशेने कारने जात असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार, सहायक पोलिस निरीक्षक हेमंत तोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने पाथर्डी शिवारातील कचरा डेपोजवळ सापळा रचून तिघांना ताब्यात घेतले. संशयितांमध्ये सागर दत्तात्रय गरड (३३), महेश सदाशिव मालखेडे (२१) आणि एक विधिसंघर्षित बालक यांचा समावेश आहे. चौकशीत त्यांनी क्रांतीनगर, मखमलाबाद येथील घरफोडीची कबुली दिली. त्यांच्याकडून चोरीस गेलेला लॅपटॉप व घड्याळ हस्तगत करण्यात आले आहे. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.