

नाशिक : मागील काही दिवसांपासून शहरात खूनाचा घटना सातत्याने सुरू असल्याने, सर्वसामान्यांमध्ये दहशतीचे वातावरण बघावयास मिळत आहे. नाशिकरोड परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौकाच्या बाजुला असलेल्या नवले कॉलनी जवळील सिक्युरिटी प्रेस खुल्या मैदानावर एका युवकाचा डोक्यात दगड टाकून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. या युवकावर धारदार हत्यारानेही वार केले असून, घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
सिन्नर फाटा स्टेशनवाडी येथे राहणारा अजय शंकर भंडारी (२४) हा सिन्नर फाटा रेल्वेस्थानक पार्किंगमध्ये काम करतो. बुधवारी (दि.१२) रात्री छत्रपती शिवाजी महाराज शिवजन्मोत्सवाच्या मिरवणुकीत बराच वेळ तो होता. तसेच मिरवणुकीत त्याने नाचण्याचा आनंद घेतला. रात्री १.३० वाजता त्याचे त्याच्या आईबरोबर फोनवर बोलणे सुद्धा झाले होते. मात्र, त्यानंतर त्याचा कुणाशी तरी वाद झाला असावा व त्यातूनच त्याच्यावर हल्ला करून त्याचा खून करण्यात आला असावा, अशी परिसरात चर्चा आहे. हत्याच्या ठिकाणी त्याची ॲक्टीवा कंपनीची दुचाकी आढळून आली आहे.
दरम्यान ही घटना परिसरात वाऱ्यासारखी पसरल्यानंतर, नागरिकांनी नवले कॉलनीच्या बाजूला असलेल्या मैदानाजवळ मोठी गर्दी केली होती. तसेच सदरची माहिती पोलिसांना समजताच नाशिकरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असता, मृतदेहाच्या बाजुला दोन दगड मिळून आले आहेत. तसेच धारदार शस्त्राने त्याच्या बोटावर, हातावर वार केल्याचेही दिसून येत आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.
अजय भंडारी याची हत्या का व कोणत्या कारणाने केली असावी, याबाबतचा पोलिस शोध घेत आहेत. त्यासाठी पोलिस या मार्गावरी सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत. अद्यापपर्यंत पोलिसांना मारेकऱ्यांचा माग काढता आला नसला तरी, पोलिसांचा कसून तपास सुरू आहे. दरम्यान, अजय भंडारी याच्या पश्चात आई, भाऊ, बहीण असा परिवार आहे.