

देवळा : बहिणीला नांदवत नाही आणि तिच्या आजारपणासाठी औषधोपचार करत नाही, या रागातून मेव्हण्याने आपल्या भावजीचा कुऱ्हाडीने वार करून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना रविवारी (दि.१०) रात्री आठच्या सुमारास देवळा तालुक्यातील खालप येथे घडली. या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. प्रकाश रुपेश गांगुर्डे (३१, रा. सरस्वतीवाडी, ता. देवळा) असे मृताचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, प्रकाश गांगुर्डे आणि त्याचा मेव्हणा समाधान भावसा पवार (रा. खालप, ता. देवळा) यांच्यात कौटुंबिक कारणावरून वाद होता. प्रकाश गांगुर्डे हा समाधान याच्या बहीणीला नांदवून घेत नव्हता. तसेच तिच्या आजारपणात दवाखान्याचा खर्चही करत नव्हता. याचा राग धरून प्रकाशचा काटा काढायचा असे समाधानने ठरविले.
रविवारी रात्री प्रकाश गांगुर्डे हा खालप-मेशी रस्त्यावरील सिमेंटच्या पुलावर मोबाईलवर बोलत उभा होता. यावेळी समाधान पाठिमागून आला व त्याने प्रकाशच्या डोक्यात कुऱ्हाडीने घाव घातले. यामध्ये प्रकाशचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच देवळा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. संशयित आरोपी समाधान पवार हा घटनेनंतर फरार झाला असून, त्याचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. त्याच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत. याप्रकरणी पोलीस निरीक्षक सार्थक नेहते यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदा पाटील आणि पोलीस उपनिरीक्षक विनय देवरे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.