

नाशिक : उपनगर पोलिसांनी सापळा रचून नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या तिघांना पकडले. या तिघांकडून ८० हजार ८०० रुपयांचे नायलॉन मांजाचे १०१ गट्टू जप्त केले. तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रज्वल गुंजाळ (रा. मोरे मळा, नाशिक रोड), यश कांगणे (रा. शिवाजीनगर, नाशिक रोड) व शुभम गुजर (रा. भगवा चौक, नाशिक रोड) अशी संशयितांची नावे आहेत. शहरात नायलॉन मांजाची विक्री, वापर व साठा करण्यावर प्रतिबंध आहे. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात तडीपारीची कारवाईदेखील प्रस्तावित केली जात आहे. नायलॉन मांजामुळे अनेकांना जीव गमवावे लागले असून, गंभीर दुखापतीही होत आहेत. त्यामुळे पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी शहरात नायलॉन मांजा विक्री, साठा करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश शहर पोलिसांना दिले आहेत. त्यानुसार परिमंडळ दोनच्या पोलिस उपायुक्त मोनिका राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त डॉ. सचिन बारी, उपनगरचे पोलिस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, गुन्हे निरीक्षक संजीव फुलपगारे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनगर पोलिसांनी सापळा रचून संशयितांना पकडले.
पोलिस अंमलदार गौरव गवळी यांना मिळालेल्या माहितीनुसार, एक संशयित सैलानी बाबा चौक परिसरात नायलॉन मांजा विक्री करण्यासाठी येणार होते. त्यामुळे पोलिसांनी सापळा रचून जुना सायखेडा रोड येथे उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे, हवालदार इमरान शेख, गवळी, अनिल शिंदे यांच्या पथकाने तपास करीत संशयावरून प्रज्वल गुंजाळला पकडले. त्याच्याकडील पिशवीत नायलॉन मांजाचे दोन गट्टू आढळले. सखोल तपासात त्याने हा मांजा यश व शुभम यांच्याकडून घेतल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी दोघांना ताब्यात घेत चौकशी केली असता, त्यांच्याकडून मांजाचे ९९ गट्टू जप्त केले आहेत. तिघांविरोधात गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
मकरसंक्रात सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. बाजारात ठिकठिकाणी पतंग, मांजाची दुकाने थाटली आहेत. या पार्श्वभूमीवर चायनीज मांजा, नायलॉन मांजा, काचेच्या चुऱ्याचे कोटिंग असलेल्या मांजाच्या विक्रीवर पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी बंदीचे आदेश दिले आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाईचे आदेश दिले आहेत.
नाशिक : नायलॉन मांजा विक्रीप्रकरणी पकडलेले तिघे संशयित व त्यांच्याकडून जप्त केलेला मांजाचा साठा. समवेत उपनगर पोलिसांचे पथक.