

नाशिक : अवघ्या १८ वर्षे वयोगटातील मुलांकडून सर्रासपणे कोयते, तलावारी, चॉपरचा वापर होत असल्याचे दररोज पोलिस दप्तरी नोंदविली जात आहे. बहुतांश प्रकरणांमध्ये अल्पवयीनांचा समावेश आहे.
सध्या गल्लोगल्ली या भाई, दादांनी अक्षरश: उच्छांद मांडल्याने, सर्वसामान्य नागरिक दहशतीत आहेत. किरकोळ कारणांवरून हाणामारीच्या घटना नित्याच्याच झाल्या असून, शहराची कायदा व सुव्यवस्था धोक्यात आली आहे. पोलिसांकडून ठोस कारवाई केव्हा होणार? असा सवाल आता नाशिककरांकडून उपस्थित केला जात आहे.
गत आठवड्यात सिडको आणि नाशिकरोड भागात कोयते, तलवारी, चॉपरचा वापर करून टोळक्याने दुचाकीवर ट्रिपल सिट बसून, आरडाओरड करीत परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. यात दोन अल्पवयीनांचाही समावेश होता. सततच्या या घटनांमुळे सर्वसामान्यांमध्ये टवाळखोरांची मोठी दहशत निर्माण होत असून, पोलिस कारवाई मात्र थंड बस्त्यात असल्याचे चित्र आहे.
गुन्हा दाखल झाल्यानंतर थातूरमातूर कारवाई केली जात असल्याने या भाई, दादांचे चांगलेच फावत आहे. म्हसरूळ आणि इंदिरानगर पोलिस ठाणे हद्दीत पोलिसांनी भाई, दादांची धिंड काढून नागरिकांना आश्वस्त करण्याचा प्रयत्न केला. मात्र, अशाप्रकारची कारवाई शहरभर करण्याची गरज असून, त्यात सातत्य असायला हवे, अशा भावना नागरिकांकडून व्यक्त केल्या जात आहेत.
गल्लीबोळात दहशत निर्माण करणाऱ्या सडकछाप भाई, दादांवर राजकीय वरदहस्त असल्याचे यापूर्वी वेळोवेळी समोर आले आहे. स्थानिक राजकारण्यांसोबत हे टवाळखोर फिरत असल्याने, त्यांना जणू काही नागरिकांना त्रास देण्याचा परवानाच मिळाल्याच्या अविरभावात ते वावरत आहेत. धक्कादायक म्हणजे या गुन्हेगारांना सर्व रसद राजकारणी पुरवत असल्याने टवाळखोरांचा उच्छाद वाढतच आहे.
गल्लीबोळात भाईगिरी करणारे सोशल मीडियावर देखील सक्रीय असून, त्यांच्या रिल्स अल्पवयीनांना प्रभावी करणाऱ्या ठरत आहेत. बरेचसे भाई, दादा सिनेमातील डायलॉग बोलणाऱ्या रिल्स बनवून त्या व्हायरल करीत असल्याने, अल्पवयीन त्यांना हिरो समजत आहेत. पोलिस अशाप्रकारच्या रिल्सवर लक्ष ठेवून असले तरी, भाई, दादांकडून रिल्स बनविण्याचा सिलसिला सुरूच आहे.
गुंडगिरी करणाऱ्या भाई, दादांना जरब बसविण्यासाठी पोलिस धडाकेबाज कारवाई करीत आहेत. टवाळखोरांची धिंड काढल्यास, त्यांना फाॅलो करणाऱ्यांवर जरब बसते. विशेषत: अल्पवयीनांच्या नजरेत ते 'झिरो' बनतात. तसेच धिंड काढल्याने, त्यांची इभ्रत गेल्याने ते पुन्हा गुन्हे करण्यास धजावत नाहीत.
अंकुश चिंतामण, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, म्हसरूळ पोलिस ठाणे