

नाशिक : सायबर भामट्यांकडून सर्वसामान्यांना गंडा घातल्याचे प्रकार नित्याचेच झालेले आहेत. मात्र, आता थेट भारतीय पोस्ट खात्यालाच गंडविल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
बनावट एटीएम कार्डद्वारे सायबर चोरट्यांनी पोस्टाच्या एटीएम सेंटरमधून ग्राहकांच्या बँक खात्यातील व पोस्टाचे तब्बल १४ लाख ११ हजार रुपये लंपास केले. याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात अज्ञात संशयितांवर गुन्हा दाखल झाला असला, तरी आता शासकीय खातेही सायबर भामट्यांच्या रडारवर असल्याची चर्चा यानिमित्त रंगत आहे.
नाशिकरोड पोस्ट ऑफिसमधील गजेंद्र भालचंद्र भुसारे यांच्या फिर्यादीनुसार, चोरट्यांनी दि. २६ डिसेंबर २०१९ ते १३ जानेवारी २०२१ या कालावधीत नाशिकरोड हेड पोस्ट ऑफिस येथील एटीएम मशीनमधून २० वेगवेगळ्या बँकांच्या एटीएम कार्डद्वारे १२४ बनावट ट्रॅन्जेक्शन करत १० लाख २० हजार रुपये काढून घेतले, तर गंजमाळ येथील जनरल पोस्ट ऑफिस येथील एटीएममधूनही ११ बँकांच्या बनावट एटीएम कार्डद्वारे ५२ बनावट ट्रॅन्जेक्शन करून तीन लाख ९१ हजार रुपये काढले. अशा पद्धतीने माहीतगार संशयिताने एकूण १७६ बनावट आर्थिक व्यवहार करून १४ लाख ११ हजार रुपये लंपास केले आहेत. सायबर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सुभाष ढवळे अधिक तपास करीत आहेत.
सायबर चोरट्यांनी पोस्ट खात्यालाच निशाणा केल्याने, खातेदारांमध्ये कमालीची अस्वस्थता निर्माण झाली आहे. सायबर चोरट्यांपासून पोस्ट खातेदेखील सुरक्षित नसल्यामुळे पोस्टात पैसे ठेवणाऱ्यांची चिंता वाढली आहे. सायबर पोलिसांनी तत्काळ चोरट्यांच्या मुसक्या आवळाव्यात, अशी मागणी खातेदारांकडून केली जात आहे.