

नाशिक : काैटुंबिक वादातून संतप्त होत पतीने नदीपात्रात उडी मारून पत्नीसमोर जीवन संपविल्याची धक्कादायक घटना कन्नमवार पुलावर घडली. चेतन श्रावण पवार (३०, रा. गौरी पंटागण) असे जीवन संपविलेल्या तरुणाचे नाव आहे.
जीवन संपविणारा चेतन हा रिक्षाचालक होता. पोलिसांच्या माहितीनुसार, चेतन व त्याची पत्नी राणी पवार हे दोघे शनिवारी (दि.२५) सायंकाळी चारच्या सुमारास कन्नमवार पुलावरून रिक्षातून जात होते. दोघांमध्ये वाद झाल्याने संतापाच्या भरात चेतनने रिक्षातून उतरून थेट नदीपात्रात उडी मारली. त्यामुळे राणी पवार यांनी आरडाओरड करीत मदत मागितली. नदीपात्रातून चेतनला काढून तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचाराआधीच चेतनचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. याप्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.