

सटाणा ( नाशिक ) : येथील ताहाराबाद रस्त्यावरील पेट्रोल पंपाजवळ बनावट नोटा चलनात आणण्याचा प्रयत्न करताना ताहाराबाद, अंतापुर व जायखेडा येथील सात संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी १५ हजार रुपये किमतीच्या ५०० रुपयाच्या चलनी नोटा तसेच १ लाख २० हजार रुपये किमतीचे ७ मोबाईल व ३ लाख रुपये किमतीची कार असा एकूण ४ लाख ३५ हजारांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे.
शुक्रवारी (दि. १९) ताहाराबादहून सटाण्याच्या दिशेने येणाऱ्या एका चारचाकी वाहनातील इसमांकडून ५०० रुपयांच्या बनावट नोटा चलनात आणल्या जात असल्याबाबतची गुप्त माहिती पोलिस निरीक्षक योगेश पाटील यांना प्राप्त झाली होती. त्यानुसार त्यांनी पथकाच्या सहाय्याने ताहाराबाद रस्त्यावर सापळा लावला. रात्री आठच्या सुमारास संशयित रेनॉल्ट कंपनीची ट्रिजर गाडी (एम.एच. ४१ बी. ई. ४६४५) ही ताहाराबादकडून सटाणा शहराजवळील एचपी पेट्रोल पंपात दाखल झाली.
त्याचवेळी पोलिसांनी संधी न दवडता संशयितांना ताब्यात घेत पोलिस ठाण्यात आणले. त्यावेळी हर्षल आबासाहेब नंदन (२०, रा. ताहाराबाद ) याच्या जॅकेटच्या उजव्या खिशातून ५०० रुपयांच्या २८ नोटा मिळून आल्या. तसेच प्रफुल्ल रवींद्र गवळी (२९, रा. अंतापूर) व श्याम दादाजी गवळी (२७, रा. अंतापुर) यांच्या खिशातून पॅन्टच्या खिशातून प्रत्येकी पाचशे रुपये रोख स्वरूपात मिळून आले. यांच्या समवेत असलेले शुभम दादाजी गवळी (२८, रा.अंतापुर), अनिकेत विलास नवरे (२०, रा. ताहाराबाद), जयेश तुकाराम पवार, (२०, रा. ताहाराबाद) गौरव संजय पवार (३०, रा. जायखेडा) यांना अटक केली. पोलिस हवालदार विशाल जाधव यांच्या फिर्यादीनुसार सर्व संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी आणखी एका संशयितास शनिवारी (दि. २०) दुपारून ताब्यात घेण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक योगेश पाटील यांनी दिली. या घटनेमुळे तालुक्यात खळबळ माजली असून पोलिस उपनिरीक्षक अमोल सूर्यवंशी हे पुढील तपास करीत आहेत.
संशयितांना पाच दिवसांची काेठडी
सर्व सातही संशयितांना शनिवारी (दि.२०) न्यायालयासमोर हजर केले असता सगळ्यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. संशयित आरोपींकडे या बनावट नोटा कशा आल्या?याबाबत सखोल पोलीस तपास सुरू करण्यात आला असून यातून आंतरराज्य मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.