Nashik Coriander Rate | कोथिंबीरीने शेतकरी मालामाल, जुडीला ४०० रुपये दर
पंचवटी : दोन दिवस अधून मधून बरसणाऱ्या पावसाने रविवारी विश्रांती घेतली होती. पालेभाज्याशी उत्पादन कमी होत असल्याने आवक घटली असून रविवार (दि.८) रोजी पार पडलेल्या लिलावात गावठी कोथिंबीरला किमान सहा हजार पाचशे रुपये तर सर्वाधिक चाळीस हजार रुपये प्रति शेकडा भाव मिळाला.
नाशिक बाजार समितीत सद्यःस्थितीत नाशिक, सिन्नर, दिंडोरी, पिंपळगाव, त्र्यंबकेश्वर आदी भागांतून पालेभाज्या व फळभाज्या येत आहेत. बाजार समितीत खरेदी केलेला शेतमाल हा मुंबई, गुजरात अहमदाबादला पाठविला जातो. पालेभाज्या आवक सद्यःस्थितीत घटली आहे. यामुळे बाजारभाव वधारले आहेत . बाजार समितीत रविवार (दि.०८) लिलावात सायंकाळी गावठी कोथिंबीरीला किमान ६५ रुपये जुडी ते सर्वाधिक ४०० रुपये जूडी, तर चायना कोथिंबीरीला किमान ४० तर सर्वाधिक २८० रुपये जूडी असा दर मिळाला. मेथी किमान ५० तर सर्वाधिक १३० रुपये जूडी, शेपू किमान २२ तर सर्वाधिक ५७ रुपये जूडी, कांदापात किमान १५ तर सर्वाधिक ४२ रुपये जूडीला भाव मिळाला आहे.
दिवसभर पाऊस उघडला होता .बाजार समितीत २०५ जुड्या गवाठी कोथिंबीर घेऊन आलो होतो. शेकडा चाळीस हजार रुपये सर्वाधिक भाव मिळाला. त्याप्रमाणे मला ८२ हजार रुपये मिळाले. कोथिंबिरीचे उत्पादन सुरू असल्यापासून पहिल्यांदाच एवढा बाजार भाव मिळाला.
दिगंबर बोडके, सायखेडा