नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा
कृषी उत्पन्न बाजार समितीत कोथिंबीरला प्रतिशेकडा तब्बल २२ हजार दर मिळाला असला तरी गेल्या २ दिवसांच्या तुलनेत शेकडा ६००० रुपयांनी घसरण झाली आहे. दुसरीकडे, फळभाज्यांचे दर तुलनेने स्थिर राहिले असले तरी पावसामुळे पालेभाज्यांची आवक कमी झाल्याने त्यांचे भाव उच्च पातळीवर कायम आहेत.
गेल्या दोन दिवसांपासून नाशिक शहर व जिल्ह्यात सुरू असलेल्या रिमझिम पावसाचा परिणाम भाजीपाला बाजारावर दिसून आला. पावसामुळे भाजीपाला ओला झाल्याने आणि आवक वाढल्याने कोथिंबीरच्या जुडीच्या दरात काहीशी घसरण झाली.
गुरुवारी हजारपेक्षा कमी जुड्यांची आवक झाल्याने कोथिंबीरला प्रतिजुडी २८५ रुपये, शुक्रवारी २८१ रुपये, तर शनिवारी ३९ हजार ३०० जुड्यांची आवक झाल्यानंतर रविवारी दर २३० रुपयांवर आला. त्यामुळे दोन दिवसांत प्रतिजुडी सुमारे ५० रुपयांची घट नोंदविण्यात आली. त्यात ढोबळी मिरची ७५०० रुपयांनी विकली गेली तर दोडकादेखील ५००० रुपयांनी विकला गेला आहे.
तर इतर सर्व भाज्यांना सर्वाधिक दर मिळाले आहेत. नाशिकमधून मोठ्या प्रमाणावर भाजीपाला मुंबई, गुजरात आणि सुरतसारख्या बाजारपेठांमध्ये पाठविला जातो. मात्र, सततच्या पावसामुळे बाहेरील व्यापाऱ्यांची खरेदी कमी झाली आहे.
ओल्या भाजीपाल्याची साठवणूक कठीण होत असल्याने मागणीवर परिणाम झाला असून, काही भाज्यांच्या दरात घसरण झाली आहे. मात्र, पालेभाज्यांचे दर अजूनही उच्च पातळीवर कायम आहेत.
दरम्यान, मुसळधार पावसामुळे नाशिक परिसरातील भाजीपाल्याचे उत्पादन आणि आवक कमी झाली आहे. वाहतुकीतील अडथळे आणि नासाडी वाढल्याने घाऊक व किरकोळ बाजारात अनेक भाज्यांचे दर ३० ते ५० टक्क्यांनी वाढले आहेत.
त्यामुळे सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघरावरील आर्थिक ताण कायम असून, गृहिणींचे बजेटही विस्कळीत झाले आहे. दुसरीकडे, ओल्या मालाला अपेक्षित दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांनाही आर्थिक फटका बसत आहे.