

नाशिक : देशात उत्तम संस्कृती रुजवण्यात, टिकवण्यात महिलांचा मोठा वाटा आहे. प्राचीन काळातील विदुषी गार्गी, मैत्रेयीपासून येथील स्त्री विद्वत्ता जोपासत समाज घडवत आहे. येथील संस्कृतीने स्त्रीयांचा सन्मान करुन त्यांना सर्वच क्षेत्रात मोठे स्थान बहाल केले. आधुनिक काळात महिलांसमोरील मोठी आव्हाने असली तरी संस्कृती टिकवून आजच्या स्त्रियांना निकोप समाजाच्या निर्मितीसाठी कार्य करावे, असे आवाहन राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी केले.
रामतीर्थ गोदासेवा समिती आणि नाशिककरांच्या वतीने माहेरवाशिन विजया राहटकर यांचा हृद्य सत्कार गुरुवारी (दि.६) गुरुदक्षिणा सभागृहात करण्यात आला. त्यावेळी सत्कारला उत्तर देताना त्या बोलत होत्या. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरु डॉ. माधुरी कानिटकर समारंभाच्या अध्यक्षस्थानी होत्या. व्यासपीठावर रामतीर्थ गोदासमितीचे अध्यक्ष जयंत गायधनी, आदिवासी विभाग आयुकत नयना गुंडे, गोखले एज्युकेशन सोसायटीच्या सचिव डॉ. दीप्ती देशपांडे यांची उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते त्यांना प्रभू श्रीरामाची मूर्ती, महावस्त्र पैठणी साडी आणि गौरवचिन्ह देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
नाशिकने संस्कार, मूल्य दिले, ते सामाजिक जीवनात काम करताना पदोपदी उपयोगी ठरत असल्याचे सांगून रहाटकर म्हणाल्या, नाशिकसोडून ३८ वर्ष झाली. परंतु येथील प्रत्येक आठवणी आजही ताज्या वाटतात. माझ्या परिवारातील सदस्य, गुरजन वर्ग आणि मैत्रिणींसमोर होणारा सत्कार माझ्यासाठी आनंददायी आहे. नाशिककरांनी केलेला हा सत्कार केवळ माझा नसून नाशिकमधील प्रत्येक कर्तृत्ववान स्त्रीचाच आहे.
अध्यक्षीय मनोगात डॉ. कानिटकर म्हणाल्या, प्रत्येक नारीमध्ये अफाट, अचाट दिव्य शकती आहे. ती सरस्वती असते, कोमल असते परंतु प्रसंगी दुर्गावतार धारण करुन प्रतिकूलतेवर मात करते.देशाची, स्त्रीने कुटुंब, समाजाला धरुन भारतीय परंपरेत, संस्कृतीचे रक्षण करुन रणरागिनी व्हावे आणि देश, समाजासाठी कार्य करावे असे आवाहन त्यांनी केेले. गोदामाईला प्रदुषणमुक्त ठेवण्यासाठी महिलांनी पूढे यावे, असे आवाहनही त्यांनी केले. याप्रसंगी भाजपचे ज्येष्ठ नेते लक्ष्मण सावजी, प्रदीप पेशकर यांच्यासह रामतीर्थ गोदा समितीचे पदाधिकारी आदी उपस्थित होेते.
आधुनिक काळात भारतीय विवाह संस्थेला हदरे बसत असल्याचे सांगून विजया रहाटकर म्हणाल्या, महिलांनी भंगणारी कुटुंबे विवेकाने मजबूत करावी. त्यात पुुरुषांनीही महिलांना साथ देण्याचे आवाहन त्यांनी केले. कामानिमित्त देशभर फिरत असते मात्र नाशिकसारखी सुंदर नगरी कुठेही नाही. गंगा गोदावरीच्या जवळ आयुष्य आकाराला आले. त्या गोदामाईच्या पावित्र्यासाठी सर्वांनी एकजूटीने काम करण्याची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले.