

नाशिक : काँग्रेस पक्षाने राज्य नेतृत्वात बदल केल्यानंतर, स्थानिक स्तरावरही फेरबदलाची चर्चा जोर धरू लागली आहे. २०१४ पासून नाशिकमध्ये पक्षाचा कारभार प्रभारी शहराध्यक्षांच्या खांद्यावर आहे. अशात नव्या नेतृत्वाकडून आता तरी पक्षाला पूर्णवेळ शहराध्यक्ष दिला जाईल का? असा सवाल कार्यकर्त्यांकडून उपस्थित केला जात आहे.
स्थानिक स्तरावरील बडे नेते, पक्षाला सोडचिठ्ठी देत असल्याने पक्ष मजबुतीचे मोठे आव्हान काँग्रेससमोर आहे. आगामी महापालिका निवडणुका लक्षात घेता, पक्षाने पूर्णवेळ शहराध्यक्ष देण्याची गरज आहे. २०१४ पासून नाशिकचा कारभार प्रभारी शहराध्यक्षांच्या खांद्यावर आहे. २०१४ मध्ये तत्कालीन शहराध्यक्ष तथा माजी नगरसेविका अश्विनी बोरस्ते यांनी वैयक्तिक कारण देत शहराध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर शरद आहेर यांच्याकडे प्रभारी शहराध्यक्षपदाचा कार्यभार सोपविला होता. मात्र, पक्षाने 'एक व्यक्ती, एक पद' हे धोरण स्वीकारल्याने अन् पक्षाने बढती देत प्रदेश उपाध्यक्षपदी निवड केल्याने, आहेर यांनी २०२२ मध्ये प्रभारी शहराध्यक्षपदाचा राजीनामा तत्कालीन प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे सोपविला होता. तब्बल आठ वर्षे आहेर यांनी प्रभारी शहराध्यक्षपदाची धुरा सांभाळली होती. त्यानंतर रिक्त झालेली शहराध्यक्षपदाची जबाबदारी पुन्हा एकदा ॲड. आकाश छाजेड यांच्यावर सोपविली गेली. मात्र, त्यांचीदेखील प्रभारीच नियुक्ती केली गेल्याने, मागील 10 वर्षांहून अधिक काळापासून नाशिक काँग्रेसच्या शहराध्यक्षपदाचा कारभार प्रभारींच्या खांद्यावर आहे.
दरम्यान, पक्षाने राज्यात नेतृत्वाची धुरा हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर सोपविल्यानंतर नाशिकलाही पूर्णवेळ शहराध्यक्ष दिला जावा, अशी अपेक्षा कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली जात आहे. आगामी महापालिका निवडणुका लक्षात घेता, पक्ष संघटनाचे मोठे आव्हान असणार आहे. अशात पूर्णवेळ शहराध्यक्ष दिल्यास पक्षवाढीसाठी मदत होईल. तसेच पक्ष सक्रिय ठेवण्यास मदत होईल, अशीही भावना कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली जात आहे.
प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे हाती घेताच हर्षवर्धन सपकाळ यांनी, राज्यातील विविध जिल्ह्यांमधील शहर व जिल्हा कार्यकारिणीत फेरबदल केले जाणार असल्याचे संकेत दिले होते. त्यानुसार नाशिकमधील शहर व जिल्ह्याला नूतन कार्यकारिणी मिळण्याची शक्यता आहे. नाशिक शहराध्यक्षपदासाठी अनेक चेहरे इच्छुक असून, काहींनी अगोदरच पक्ष नेतृत्वाकडे याबाबतची इच्छा बोलून दाखविल्याची माहितीही समोर येत आहे.
लोकसभा, विधानसभा निवडणुका पार पडल्या असून, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची जोरदार तयारी भाजपसह राष्ट्रवादी आणि शिवसेना या सत्ताधारी पक्षांकडून केली जात आहे. भाजपने सदस्य नोंदणी हाती घेतली असून, पक्षवाढीसाठी पावले उचलली जात आहेत. दुसरीकडे काँग्रेसमध्ये मात्र कुठल्याच हालचाली दिसून येत नसल्याची स्थिती आहे. गेल्या महापालिका निवडणुकीत काँग्रेसचे अवघे सहा नगरसेवक शहरात निवडून आले होते. अशात आगामी निवडणुकीत मोठी मुसंडी मारायची असल्यास, काँग्रेसला पक्षवाढीसाठी प्रयत्न करावे लागणार आहेत.