Nashik Congress | काँग्रेस प्रभारींसमोरच पदाधिकाऱ्यांनी झाडल्या आरोपांच्या फैरी

पक्षातील गट-तट चव्हाट्यावर
Nashik Congress
शहर काँग्रेस कमिटी बैठकीत बोलताना प्रभारी ब्रिजकिशोर दत्त. व्यासपीठावर पदाधिकारी.Pudhari Photo
Published on
Updated on

नाशिक : शहर काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली. यावेळी पदाधिकाऱ्यांनी पक्षाचे प्रभारी ब्रिजकिशोर दत्त यांच्यासमोरच एकमेकांवर आरोपांच्या फैरी झाडल्या. एकमेकांची उणीदुणी काढली. पक्षात आलबेल नसल्याचे प्रदर्शन करणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर, प्रभारी दत्त चांगलेच संतप्त झाले होते. त्यांनी पदाधिकाऱ्यांचे कान टोचले, मात्र अंतर्गत गटबाजी बघता, आगामी विधानसभेचे दिव्य पार पाडणे अवघड असल्याची जाणीवही त्यांना झाली.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविवारी (दि. ७) सातपूर येथील हॉटेल अयोध्या येथे पक्षाचे प्रभारी दत्त यांच्या प्रमुख उपस्थितीत नाशिक शहर काँग्रेस कमिटीची बैठक घेण्यात आली. याप्रसंगी व्यासपीठावर शहराध्यक्ष आकाश छाजेड, माजी आमदार शिरीष कोतवाल, माजी नगरसेविका हेमलता पाटील, राहुल दिवे, लक्ष्मण जायभावे, राजेंद्र बागूल, हनीफ बशीर, सरचिटणीस दीपक राव, स्वाती जाधव, गुलजार कोकणी, बबलू खैरे, उल्हास सातभाई, महिला काँग्रेस ब्लॉक अध्यक्षा माया काळे आदी उपस्थित होते. बैठकीच्या प्रारंभी नाशिक मध्य विधानसभेचे ब्लॉक अध्यक्ष बबलू खैरे यांनी, नाशिक लोकसभा निवडणुकीत घोषित केलेल्या १४० कार्यकारिणी सदस्यांपर्यंत नियुक्तिपत्र पोहोचले नसल्याचे सांगत कमिटीच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. यावेळी माजी नगरसेवक लक्ष्मण जायभावे, राजेंद्र बागूल, गुलजार कोकणी, हनीफ बशीर यांनीदेखील पक्षातील गटबाजीवरून एकमेकांवर वाग्बाण सोडले. राहुल दिवे यांनी नाशिक मध्यच नव्हे, तर विधानसभेच्या १५ जागांवर दावा करावा, अशी मागणी केली. तर आकाश छाजेड यांनी, नाशिक मध्यची जागा काँग्रेसला न सोडल्यास सांगली पॅटर्न राबविणार असल्याचा इशारा दिला.

प्रभारी दत्त यांनी टोचले कान

दरम्यान, पदाधिकाऱ्यांमधील गटबाजी बघून प्रभारी दत्त यांनी त्यांचे कान टोचले. तसेच सभागृहातील रिकाम्या खुर्च्या बघून नाराजी व्यक्त केली. आम्ही बैठकीसाठी मुंबईहून नशिकला येतो, मात्र दोन-पाच किलोमीटरमधील पदाधिकारी बैठकीला येऊ शकत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. तसेच नाशिक मध्यची जागा अल्लाउद्दिनचा चिराग झाला असून, जो उठतो तो चिराग घासत आहे. तिकीट मिळाले म्हणजे आमदार होता येत नाही. त्यासाठी कामे करावी लागत असल्याचे सांगत दत्त यांनी पदाधिकाऱ्यांचे कान टोचले.

हेमलता पाटील यांचा बैठकीतून काढता पाय

आपल्याविरोधात घाणेरडे राजकारण केले जात आहे. आपण पक्ष बदलणार असल्याची अफवा पसरवत वरिष्ठांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न काही पदाधिकारी करीत आहेत. १९९४ पासून आपण महापालिकेत निवडून येत आहोत. मागील विधानसभा निवडणुकीत नाशिक मध्य विधानसभा निवडणुकीत उमेदवार मिळत नव्हता, त्यावेळी पक्षश्रेष्ठींच्या आदेशाने कुठलीही तयारी नसताना निवडणूक लढवत ४७ हजार मते मिळवली. आज मी स्वतः निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असताना, माझ्या विरोधात षडयंत्र रचले जात आहे. वार करायचे असेल, तर समोरून करा, पाठीत खंजीर खुपसू नका अशा शब्दांत माजी नगरसेविका हेमलता पाटील यांनी आपला राग व्यक्त करत काम असल्याचे सांगत बैठकीतून काढता पाय घेतला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news