

नाशिक : विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर गुन्ह्यांना प्रतिबंध घालण्यासाठी तसेच रेकॉर्डवरील गुन्हेगारांविरुद्ध कारवाई करण्याबाबत नाशिकरोड, सातपूर परिसरात राबविण्यात आलेल्या कोम्बिंग ऑल आऊट ऑपरेशनअंतर्गत एका गावठी कट्ट्यासह एक घातक हत्यार व दोन तडीपार संशयित आढळून आले.
शुक्रवारी (दि. १८) सायंकाळी ७ ते रात्री १० वाजेदरम्यान कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आले. यावेळी रेकॉर्डवरील २०६ गुन्हेगारांना तपासण्याचा प्रयत्न केला असता, मिळून आलेल्या गुन्हेगारांकडे चौकशी करून त्यांच्याकडून चौकशी अर्ज भरून घेण्यात आले. उपनगर पोलिस ठाणे हद्दीत रेकॉर्डवरील संशयित आरोपी इंद्रजीत राजू वाघ याच्या ताब्यात शिखरेवाडडी मैदानाजवळ एक गावठी बनावटीचा कट्टा आढळून आला. त्याच्याविरोधात भारतीय हत्यार कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच मोरेमळा, पवारवाडी येथे सुनील जाधव याच्याकडे विनापरवाना १५ नगर देशीदारूच्या बाटल्या आढळून आल्या. त्याच्यावर दारूबंदी कायद्यान्वये कारवाई करण्यात आली.
नाशिकरोड पोलिस ठाणे हद्दीत राम बाळू पवार (रा. सिन्नर फाटा) याच्या ताब्यात घातक हत्यार (कोयता) मिळून आल्याने, त्याच्यावर भारतीय हत्यार कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. तडीपार गुन्हेगार तपासले असता, उपनगर व नाशिक रोड पोलिस ठाणे हद्दीत नितीन बनकर (रा. रोकडोबा वाडी), उमेश गायधनी (रा. पळसे) हे दोघे निर्बंधित क्षेत्रात मिळून आल्याने, त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलिस आयुक्त शेखर देशमुख, डॉ. सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली.
सातपूर पोलिस ठाणे हद्दीत कोटपा कायद्यान्वये सहा जणांवर कारवाई करण्यात आली. तर १४३ टवाळखोरांना पोलिसी खाक्या दाखविण्यात आला. यावेळी ३३ समन्स व १३ वॉरंटची बजावणीही करण्यात आली. मोटार वाहन कायद्यान्वये ११३ इसमांवर कारवाई केली गेली.