

नाशिक : मृतदेहाच्या गळ्यातील साेन्याची पोत चाेरल्याचा आरोप असलेल्या जिल्हा शासकीय रुग्णालयातील (Nashik Civil Hospital) सफाई कामगाराची तडकाफडकी झोडगे ग्रामीण रुग्णालयात बदली करण्यात आली आहे. सुधीर राठाेड असे या कर्मचाऱ्याचे नाव आहे.
इंदिरानगर येथील सराफनगर परिसरात दाम्पत्याने गळफास घेत आत्महत्या केली होती. तसेच त्यांच्या मुलीचाही मृतदेह आढळून आला. तिघांचे मृतदेह बुधवारी (दि.१८) सकाळी जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणले होते. त्यावेळी महिला पर्यवेक्षकाला महिलेच्या गळ्यात तुटलेली पोत आढळून आली. सखोल तपासात रुग्णवाहिकेतून रुग्णालयात मृतदेह आणताना संशयित राठोड याने पोत चोरल्याचा संशय वर्तवण्यात आला. पोलिसांनी अंगझडती घेतली असता त्याच्या खिशात पोत आढळून आली. त्यानंतर संशयित पसार झाला होता. या प्रकाराने संतापाची लाट उसळली. राठोडविरोधात अद्याप मृतांच्या नातलगांनी तक्रार न दिल्याने कायदेशीर कारवाई झाली नसल्याचे सुत्रांनी सांगितले. मात्र जिल्हा रुग्णालय प्रशासनाने यासंदर्भात मुख्य प्रशासकीय अधिकारी व्ही. डी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमण्यात आली आहे. तसेच राठोडची झोडगे ग्रामीण रुग्णालयात बदली करण्यात आली आहे.