

नाशिक : शहर व परिसरात घरफोड्यांचे सत्र सुरूच असून, सातपूर व नाशिकरोड परिसरात तीन घरफोड्या झाल्या. चोरट्यांनी सुमारे सव्वाचार लाख रुपयांचा ऐवज चोरला आहे.
घरफोडीचा पहिला प्रकार सातपूर परिसरात घडला आहे. फिर्यादी ऋषिकेश शिवाजी बोरसे (22) हे शिव कॉलनीतील मोहित अपार्टमेंटच्या फ्लॅट नं. 14 मध्ये राहतात. दि. 24 ते 25 ऑगस्टदरम्यान, चोरट्याने घराचा कडीकोयंडा तोडून घरात प्रवेश केला. कपाटातील ड्रॉवरमधून एक लाख 73 हजार 850 रुपयांचे सोन्या-चांदीचे तसेच रोकड असा ऐवज लंपास केला.
याचप्रमाणे नाशिकरोड परिसरातील गोरेवाडी येथे चोरट्यांनी दोन ठिकाणी घरफोडी करून एकूण अडीच लाख रुपयांचा ऐवज लंपास केला. फिर्यादी चंद्रकला अनिल आहिरे (45, रा. नीला रो-हाउस, गोरेवाडी, नाशिकरोड) यांच्या घरी दि. 24 ते 25 ऑगस्टदरम्यान ही चोरी झाली.
घरातील लॉकरमधील सोन्या-चांदीचे दागिने लंपास केले. तिसरा घरफोडीचा प्रकार गोरेवाडी परिसरात बुद्धविहाराजवळ भाड्याच्या घरात राहणार्या वैशाली लक्ष्मण गोतरणे यांच्या घरात घडला. अज्ञाताने सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले. या प्रकरणी नाशिकरोड पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.