

सह्याद्रीचा माथा — डॉ. राहुल लाळकर
नाशिक शहराचा पक्षी म्हणून अलीकडेच गिधाडाची निवड करण्यात आली. या निवडीने तमाम कावळ्यांच्या पक्षिजगतात अस्वस्थता निर्माण झाली असावी. इतकी वर्षे पिंडाला शिवण्यापासून ते काव-काव करीत शहराच्या सांस्कृतिक जीवनात आपले स्थान टिकवून ठेवणाऱ्या कावळ्यांच्या अचानक डावलले गेल्याची भावना झाली तर नवल नाही.
आता या अन्यायाविरोधात कावळ्यांनी उपोषणाचे हत्यार उपसले, तर प्रशासनाची चांगलीच पंचाईत होईल! कावळ्यांच्या संघटनांनी मोर्चा काढला, निवड प्रक्रियेची चौकशी मागितली किंवा थेट निवडणूक आयोगाकडे धाव घेतली, तर आश्चर्य वाटायला नको. काही पक्षिप्रेमींनी तर या निवड प्रक्रियेत ईव्हीएमचा वापर झाला होता की काय, अशी शंकाही व्यक्त केली असावी!
पण गंमत बाजूला ठेवली, तर गिधाड आणि कावळा या दोन्ही पक्षांचे नाशिकशी असलेले नाते केवळ पक्षिजगतापुरते मर्यादित नाही. त्याला रामायणकालीन आणि धार्मिक परंपरांचीही पार्श्वभूमी आहे. राजा दशरथाचे दशक्रिया विधी प्रभू रामचंद्रांनी रामतीर्थावर केल्याची पौराणिक आख्यायिका सांगितली जाते.
आजही देशाच्या कानाकोपऱ्यातून हजारो भाविक दशक्रिया विधीसाठी नाशिकमध्ये येतात. या विधिमध्ये कावळ्याच्या स्पर्शाला विशेष महत्त्व आहे. पिंडाला कावळा शिवला की पितरांची इच्छा पूर्ण झाली, अशी श्रद्धा अनेक कुटुंबांमध्ये आहे. त्यामुळे कावळा हा नाशिकच्या धार्मिक आणि सांस्कृतिक जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. 'काकस्पर्श' या मराठी चित्रपटानेही या श्रद्धेभोवतीचे भावविश्व प्रभावीपणे मांडले आहे.
दुसरीकडे, गिधाड म्हटले की, रामायणातील जटायू आठवतो. सीतेचे अपहरण करून नेणाऱ्या रावणाशी प्राणपणाने लढणारा जटायू हा त्याग, शौर्य आणि धर्मनिष्ठेचे प्रतीक आहे. जटायूचे नाते नाशिक परिसराशी जोडले जाते. अंजनेरी पर्वतरांगांमध्ये गिधाडांची वस्ती आजही आहे. त्यामुळे गिधाडाची निवड करण्यामागे पर्यावरणीय आणि ऐतिहासिक संदर्भ असू शकतात.
निसर्गाच्या साखळीत गिधाडांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. मृत प्राण्याचे अवशेष खाऊन पर्यावरण स्वच्छ ठेवण्याचे महत्त्वाचे काम हा पक्षी करतो. मात्र, गेल्या काही दशकांत गिधाडांची संख्या चिंताजनक रित्या घटली आहे. त्यामुळे या पक्ष्याच्या संवर्धनासाठी जनजागृती करण्याच्या दृष्टीने ही निवड महत्त्वाची ठरू शकते.
मात्र, या निवडीला आणखी एक वेगळा संदर्भ जोडला जात आहे. तो म्हणजे खऱ्या गिधाडांची घटती संख्या आणि खोट्या गिधाडांची वाढती संख्या! निसर्गातील गिधाडे मृत प्राण्यांवर जगतात; पण माणसांच्या स्वप्नांवर, सार्वजनिक पैशांवर जगतात, असा टोमणा राजकीय अन् प्रशासकीय वर्तुळात मारला जात आहे.
विशेषतः आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये हजारो कोटी रुपयांच्या विकासकामांची आखणी सुरू आहे. निधी, कंत्राटे, निविदा, बांधकामे आणि विविध प्रकल्प यांची मोठी उलाढाल होणार आहे. अशा वेळी या पैशांवर डोळा ठेवून बसलेल्या गिधाडांची आठवण होणे, स्वाभाविकच म्हणावे लागेल!
कुंभमेळा हा श्रद्धेचा, अध्यात्माचा आणि सांस्कृतिक एकात्मतेचा महोत्सव आहे. देश-विदेशातून कोट्यवधी भाविक नाशिकमध्ये येणार आहेत. त्यांच्या सुविधांसाठी पायाभूत सोयी उभ्या राहणार आहेत. रस्ते, पूल, घाट, पाणीपुरवठा, स्वच्छता, वाहतूक व्यवस्था अशा अनेक कामांवर मोठा खर्च होणार आहे. या सगळ्या प्रक्रियेत पारदर्शकता, दर्जा आणि उत्तरदायित्व राखले जाणे अत्यंत आवश्यक आहे.
कारण कुंभमेळ्याच्या नावाखाली सार्वजनिक पैशांची उधळपट्टी झाली, कामांचा दर्जा घसरला किंवा कंत्राटदार आणि अधिकारी यांच्या संगनमतांतून जनतेच्या पैशांवर डल्ला मारला गेला, तर त्याचे परिणाम नाशिकला दीर्घकाळ भोगावे लागतील. जटायूने सीतेच्या रक्षणासाठी रावणाशी लढा दिला होता. आता नाशिकच्या सार्वजनिक संपत्तीच्या रक्षणासाठी कोणता जटायू पुढे येणार, हा प्रश्न आहे.
जागरूक नागरिकांची गरज
निसर्गातील गिधाडे पर्यावरणाचा समतोल राखतात. त्यांचे अस्तित्व टिकवणे ही काळाची गरज आहे. पण मानवी गिधाडांचे काय करायचे, हा प्रश्न अधिक गंभीर आहे. कारण निसर्गातील गिधाडांना वाचवण्यासाठी संवर्धनाच्या योजना आखता येतात; मानवी गिधाडांना रोखण्यासाठी मात्र प्रामाणिक प्रशासन, कठोर देखरेख आणि जागरूक नागरिकांची गरज असते.
या संदर्भात विजय तेंडुलकर यांच्या 'गिधाडे' या गाजलेल्या नाटकाची देखील आठवण झाल्याशिवाय राहत नाही. मानवी स्वार्थ, लोभ, सत्तेची हाव आणि नात्यांमधील क्रूरता यांचे भयावह दर्शन या नाटकात घडते. तेंडुलकरांची केवळ पक्षांची प्रतिमा नाही, तर माणसातील हिंस्त्र वृत्तीचे प्रतीक आहेत. मृतदेहावर ताव मारणाऱ्या गिधाडांपेक्षा जिवंत माणसांच्या हक्कांवर ताव मारणारी मानवी गिधाडे अधिक धोकादायक असतात, हा या नाटकाचा आशय आजही अस्वस्थ करणारा आहे.
नाशिकमध्ये कुंभमेळ्याच्या निमित्ताने विकासाची मोठी संधी चालून आली आहे. मात्र, या संधीचे सोने करण्याऐवजी कुणी त्यातून स्वतःची तुंबी भरण्याचा प्रयत्न केला, तर ते दुर्दैवी ठरेल. ज्या गिधाडाची निवड शहराचा पक्षी म्हणून केली गेली आहे, त्याच गिधाडाच्या नावाने प्रशासनाने एक वेगळाच संदेश घ्यायला हवा. शहरातील नैसर्गिक गिधाडांचे संवर्धन करा आणि सार्वजनिक पैशांवर टपून बसलेल्या मानवी गिधाडांवरही लक्ष ठेवा!
नाशिकच्या पक्षी निवडीचा हा योगायोग असू शकतो. त्यामागे कोणताही राजकीय किंवा प्रशासकीय सूचक काही बुद्धीनिष्ठ मांडतही असतील. मात्र, या निवडीच्या निमित्ताने शहराने एक गोष्ट लक्षात ठेवावी. जटायुचे गिधाड शौर्याचे प्रतीक आहे, तर तेंडुलकरांच्या नाटकातील गिधाडे लोभाचे प्रतीक आहेत.
नाशिकला नेमके कोणते गिधाड हवे, हे ठरण्याची वेळ आता आली आहे! कावळ्यांनी निवडीविरोधात आंदोलन केले, तर त्यांची समजूत काढता येईल; पण कुंभमेळ्याच्या निधीवर टपून बसलेल्या गिधाडांना कोण समजावणार? आणि त्याहून महत्त्वाचे म्हणजे, त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी एखादा जटायू तयार आहे का?