नाशिक : पांडाणे टोलवसुलीवर नागरिकांत नाराजी

25 किमी परिसरातील वाहनधारकांना सुट देण्याची मागणी; खासदार भगरे यांच्या सोबत टोल प्रशासनाची बैठक
वणी, नाशिक
रस्त्याच्या अर्धवट कामामुळे आणि मूलभूत सोयी-सुविधांचा अभाव असल्याने वाहनचालक व स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.Pudhari News Network
Published on
Updated on

वणी : सोनगड ते शिर्डी राष्ट्रीय महामार्गावर सराड-वणी-पिंपळगाव या ४७ किमीच्या अंतरासाठी पांडाणे येथे टोल वसुली सुरू करण्यात आली आहे. मात्र, रस्त्याच्या अर्धवट कामामुळे आणि मूलभूत सोयी-सुविधांचा अभाव असल्याने वाहनचालक व स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे.

टोलवसुलीच्या पार्श्वभूमीवर दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भास्कर भगरे यांच्या उपस्थितीत टोल नाका व्यवस्थापन आणि स्थानिक प्रशासन यांच्यात बैठक झाली. या बैठकीत स्थानिक नागरिक आणि २५ किमी अंतरापर्यंत असलेल्या शेतकऱ्यांना सवलत देण्याची मागणी करण्यात आली. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा होईपर्यंत तात्पुरत्या उपाययोजना करण्याच्या सूचनाही टोल वसुली करणाऱ्या मॅप इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे व्यवस्थापक विनोद जाधव यांना देण्यात आल्या.

अर्धवट काम, असमान रस्ता डोकेदुखी

पांडाणे येथे टोलवसुली सुरू करण्यापूर्वी रस्त्याच्या दुरवस्थेचा विचार न केल्यामुळे वाहनचालक त्रस्त आहेत. महामार्गावरील विविध भागांत मोठमोठे खड्डे, अर्धवट सोडलेले काम, रस्त्याच्या कडेला साईड पट्ट्यांचा अभाव आणि ठिकाणानुसार बदलणारी रुंदी यामुळे वाहतुकीला अडथळे निर्माण होत आहेत. काही ठिकाणी रस्ता १२ मीटर, काही ठिकाणी २० मीटर, तर काही ठिकाणी केवळ ७ मीटर रुंद आहे. त्यामुळे वाहनचालक आणि स्थानिक नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

सार्वजनिक बांधकाम विभाग अधिकाऱ्यांची अनुपस्थिती

टोल नाक्यावर झालेल्या बैठकीत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी हजेरी लावली नाही. त्यामुळे नागरिकांच्या समस्या कोणासमोर मांडायच्या, हा प्रश्न उपस्थित झाला आहे.

टोल व्यवस्थापन कंपनीकडून सवलतीसाठी प्रयत्न

पांडाणे टोल वसुलीचे कंत्राट मॅप इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडे असून, पुढील तीन महिन्यांसाठी कंपनीकडून टोल वसुली केली जाणार आहे. टोल संदर्भात वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा करून स्थानिक नागरिकांना सवलतीचा निर्णय घेतला जाईल, असे टोल व्यवस्थापनाने स्पष्ट केले आहे.

पांडाणे येथील टोल वसुलीला सुरुवात करण्यापुर्वी रस्त्यावर असलेले खड्डे, अर्धवट कामे साईटपट्ट्या यांची कामे पूर्ण करणे गरजेचे होते. टोलनाका प्रशासनाने टोल वसुली करताना टोलच्या परिसरातील सुमारे २५ किलोमिटर अंतराच्या आत वास्तव्यास असलेले शेतकरी तसेच वाहनधारकांना टोलमाफी द्यावी, अशी मागणी शासनाकडे केली जाणार आहे.

भास्कर भगरे, खासदार, दिंडोरी, नाशिक.

टोल प्रकरणी खासदारभास्कर भगरे यांच्यासह स्थानिक वाहनचालक, शेतकरी यांनी टोलनाका परिसरातील २५ किमी अंतरातील वाहनधारकांना टोल माफीची मागणी केली. या प्रकरणी शासन स्तराहुन पुढील आदेश आल्यानंतर शासकीय आदेशाप्रमाणे टोलमध्ये सूट देण्यात येईल.

विनोद जाधव, मुख्य अधिकारी, मॅप इन्फ्रा प्रा. लि.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news