जिल्ह्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत बालमृत्यूचे प्रमाण घटल्याची सकारात्मक बाब समोर आली आहे. सप्टेंबर 2023 अखेर बालमृत्यूचे प्रमाण 268 होते. ते यंदा 30 ने घटले आहे. सप्टेंबर 2024 अखेर हे प्रमाण 238 इतके झाले आहे. (An increase in infant mortality is seen in Nashik)
पेठ, सुरगाणा, त्र्यंबक या आदिवासी तालुक्यांमध्ये बालमृत्यूचे प्रमाण घटले असले, तरी बागलाण, इगतपुरी, दिंडोरी, नाशिक तालुक्यांत वाढ दिसत आहे. या भागात बालमृत्यू कमी करण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. सन 2023 मध्ये 0 ते 1 वयोगटातील बालमृत्यूचे प्रमाण 225 इतके होते, तर 1 ते 5 वयोगटांतील मृत्यूचे प्रमाण 43 होते. त्यात घट होऊन सप्टेंबर 2024 अखेर हे प्रमाण अनुक्रमे 183 आणि 55 इतके झाले आहे. सन 2023 मध्ये त्र्यंबकेश्वर, सुरगाणा, निफाड, इगतपुरी या भागांत बालमृत्यूचे प्रमाण वाढले होते.
यापैकी त्र्यंबकेश्वर, सुरगाणा, निफाडमध्ये घट झाली, तर दिंडोरी, इगतपुरी येथे बालमृत्यूचे प्रमाण कायम आहे. जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग बालमृत्यूचे प्रमाण कमी होण्यासाठी सतत प्रयत्नशील असतो. यामुळे यंदा बालमृत्यूत घट झाली आहे. मागील वर्षी न्यूमोनियाने 21 मृत्यू झाले होते, त्यात 9 ने घट होऊन हे प्रमाण 12 वर आले आहे.
यंदा कमी वजनाची 40, जंतुसंसर्ग 13, श्वास घेण्यास त्रास 25, जन्मत: व्यंग 12, इतर आजारांनी 18 बालके दगावली आहेत.
आदिवासी व बिगर आदिवासी तालुक्यांत आशा सेविका, अंगणवाडी सेविका, वैद्यकीय अधिकारी, आरोग्यसेवक, आरोग्यसेविका यांच्यामार्फत बाळाची जन्मत:च घ्यावयाची काळजी, लसीकरण, पोषण आहार यावर लक्ष केंद्रित करून जनजागृती करण्यात येत आहे. परिणामी गेल्या वर्षीच्या तुलनेत बालमृत्यूत घट झाली आहे. हे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी प्रयत्नशील आहोत.
डॉ. हर्षल नेहते, माता व बालसंगोपन अधिकारी, नाशिक.