नाशिक : भारतीय संस्कृतीत गुढीपाडवा अर्थात चैत्र शुद्ध प्रतिपदा महापर्व म्हणून साजरा करण्याची परंपरा आहे. हिंदू नववर्ष दिनाचे औचित्यावर रविवारी (दि. ३०) शहर व परिसरातून विविध ३० संस्थांतर्फे चित्ररथांसह शोभायात्रा काढण्यात येणार आहेत.
मांगल्य, पावित्र्य आणि विजयी परंपरेचे प्रतीक असलेली गुढी घरोघरी उभारली जाणार असून, शहर व परिसरात सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
नववर्ष स्वागत यात्रा समिती आणि नाशिक महापालिकेतर्फे हिंदू नववर्षानिमित्त गोदातीरावरील पाडावा पटांगणावर गेली चार दिवस सुरु असलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांचा समारोप रविवारी(दि.३०) शोभायात्रेने होणार आहे. काळाराम मंदिराच्या पूर्व दरवाज्यापासून प्रारंभ होणार आहे. नागचौक, गजानन चौक, पाथरवट लेन, मालविय चौक असे मार्गक्रमण करत पाडवा पटांगणावर यात्रेचा समारोप होईल.
नेरकर प्रॉपर्टीज यांच्यातर्फे नववर्ष स्वागत यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ७ वाजता गंगापूररोडवरील केबीटी सर्कल येथून यात्रेला प्रारंभ होईल. प्रसाद सर्कलपर्यंत निघणाऱ्या यात्रेत वारकरी, ढोलपथक, दुचाकीस्वार, वासुदेवाची स्वारी, गुढीचा चित्ररथ, पारंपरिकर फेट्यात नागरिक सहभागी होणार आहे. स्वागत यात्रेत पाच जिवंत चित्ररथ सहभागी होणार असून, त्यात छत्रपती शिवाजी महाराज, विठू माऊली, महोदव, ज्योतिबा, मल्हारी मार्तंड यांचा समावेश असणार आहे.
साडेतीन मुहूर्तांपैकी एक पूर्ण मुहूर्त असल्यामुळे गुढीपाडवा ही महत्वूपूर्ण शुभ तिथी मानली जाते. त्यामुळे हा पूर्ण दिवसच शुभ असतो. हिंदू पंचागानुसार शनिवारी(दि.३०) संध्याकाळपासूनच नवीन तिथीला सुरुवात होणार असून, चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदा या तिथीचा शुभारंभ शनिवारी(दि.२९) सायंकाळी ४ वाजून २९ मिनिटांनी होणार असून, रविवारी (दि. ३०) १२.५२ मिनिटांनी समाप्त होणार आहे. त्यामुळे रविवारी पहाटेपासून गुढी उभारण्यासाठी शुभमुहूर्त असणार आहे.
नवीन नाशिक, सिडको परिसरातून ग्रामोदय विद्यालय, छत्रपती शिवाजी चौक, सिडकोपासून शोभायात्रेला प्रारंभ होणार असून, लक्ष्मण चौक मंदिरात समारोप होईल. यासह गणेशवाडी, रामवाडी, मधुबन कॉलनी, मखमलाबाद रोड, नाशिक रोड आदी ठिकाणांहून स्वागत यात्रा निघणार आहेत.
साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सोने, चांदी, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, वाहन व घर खरेदी शुभ मानली जात असल्याने, नाशिककरांकडून रविवारी (दि. ३०) खरेदीची गुढी उभारली जाणार आहे. मागील काही दिवसांपासून सर्वच क्षेत्रांत बुकिंगचा धडाका सुरू असून, मुहूर्तावर डिलिव्हरी मिळविण्याचा अनेकांचा मानस आहे, तर बहुतांश कुटुंबांनी पाडव्याच्या मुहूर्तावर गृहप्रवेश करण्याचे निश्चित केले आहे.
यंदा पाडवा मार्च महिन्याच्या अखेरीस आल्याने १ एप्रिलपासून वाहन, सोने, घर यांसह इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंवर लागणाऱ्या अतिरिक्त करांपासून सुटका करण्यासाठी अनेकांनी महिन्याच्या प्रारंभीच वस्तू बुकिंगवर भर दिला, तर पाडव्याच्या दिवशी डिलिव्हरी मिळविण्याचे नियोजन केले. गेल्या वर्षी वाहनांना वेटिंग असल्याने अनेकांचा हिरमोड झाला. यंदा मात्र तशी परिस्थिती नसून, ग्राहकांना पाडव्याच्या मुहूर्तावर वाहन घरी आणणे शक्य होणार आहे. वाहन विक्रेत्यांच्या मते, गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर साडेचार हजार दुचाकी, तर बाराशेहून अधिक चारचाकी वाहनांची विक्री होण्याचा अंदाज आहे.
रिअल इस्टेट क्षेत्रातदेखील तेजीचे वातावरण असून, ३५० ते ४०० फ्लॅट, रो-हाउसचे बुकिंग झाले आहे. १ एप्रिलपासून रेडीरेकनरचे वाढीव दर लागू होणार असल्याने गेल्या काही दिवसांपासून दस्त नोंदणी जोरात सुरू आहे. तसेच इलेक्ट्रॉनिक्स बाजारातही तेजीचे वातावरण आहे.
सोने दरात तेजीचे वातावरण असले, तरी ग्राहकांकडून खरेदीला प्राधान्य दिले जात आहे. शनिवारी सोन्याच्या दरांनी उच्चांकी नोंद केली. २४ कॅरेट सोने प्रतितोळा ९२ हजार २०० रुपयांवर पोहोचले, तर २४ कॅरेट सोने प्रतितोळा ८४ हजार ९०० रुपयांवर पोहोचले आहे. चांदीतील तेजी कायम असून, प्रति एक किलो चांदीचा दर एक लाख सात हजारांवर पोहोचला आहे.
४५०० हजार दुचाकी विक्री
१२०० चारचाकी विक्री
३५० फ्लॅटची विक्री
५० रो-हाउसेसची विक्री
२०० कोटींची सोने-चांदीत उलाढाल
(आकडे अंदाजित आहेत)
गुढीपाडव्याला सोने- चांदी खरेदी शुभ मानली जात असल्याने, पारंपरिक ग्राहकांकडून खरेदीला प्राधान्य दिले जाणार आहे. आगामी काळातील लग्नसराई लक्षात घेता, सराफ बाजारात खरेदीचा उत्साह आहे.
चेतन राजापूरकर, संचालक, इंडियन बुलियन व ज्वेलर्स असोसिएशन, नाशिक
रिअल इस्टेट क्षेत्रात तेजीचे वातावरण असून, बुकिंग चांगले आहे. स्टॅम्पची विक्रीही मोठ्या प्रमाणात झाली आहे. आगामी सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर गुढीपाडव्याला घरे खरेदीस प्राधान्य दिले जाण्याची शक्यता आहे.
कृणाल पाटील, अध्यक्ष, क्रेडाई, नाशिक
गेल्या महिनाभरापासून बुकिंग केले जात असून, गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर डिलिव्हरी देण्याचे आव्हान आहे. यंदा गाड्यांची मुबलकता असल्याने, ग्राहकांना मुहूर्तावर डिलिव्हरी देता येणार आहे.
पंकेश चंद्रात्रे, व्यवस्थापक, टाटा मोटर्स, नाशिक