

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
सुधारणा आणि पुनर्वसन हे कारागृहाचे ब्रीदवाक्य असताना, नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात मात्र बेकायदेशीर वस्तूंची घुसखोरी रोखण्यात तुरुंग प्रशासनाला अपयश येत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले. कारागृहातील सुरक्षा कर्मचाऱ्याकडे चरस हा अमली पदार्थ सापडल्याच्या घटनाला आठवडा उलटत नाही, तोच आता कारागृहात कार्यरत हवालदाराकडे देशी दारूची बाटली आढळून आली आहे.
एकापाठोपाठ उघडकीस येणाऱ्या या घटनांमुळे तुरुंग प्रशासनाच्या सुरक्षेवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यादव कचरू जाधव (५७, कारागृह हवालदार) असे देशी दारूची बाटली आढळलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. दि. १ नोव्हेंबर रोजी सकाळी ९.३० ते १० दरम्यान कारागृहातील बराक क्रमांक एकच्या मुख्य प्रवेशद्वारराजवळ हा प्रकार घडला.
कारागृह हवालदार नागराज बाबुलाल आहिरे (५६) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली. कारागृहाच्या मुख्य प्रवेशद्वारराजवळ नियमित तपासणी सुरू असताना, यादव जाधव यांची अंगझडती घेण्यात आली. यावेळी त्यांच्या अंगझडतीमध्ये 'प्रिन्स संत्रा १८० एमएल' असे लेबल असलेली देशी दारूची सीलबंद काचेची बाटली आढळून आली.
कारागृह परिसरात मद्यास नेण्यास प्रतिबंध असतानाही संबंधित कर्मचाऱ्याकडे दारूची बाटली सापडल्याने प्रशासनात खळबळ उडाली. याप्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, हवालदार झाडे अधिक तपास करीत आहेत.
विशेष म्हणजे, दि. ४ नोव्हेंबर रोजी रवींद्र एकनाथ पाटील या कारागृह कर्मचाऱ्याकडे चरस हा अमली पदार्थ आढळून आला होता. याप्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेनंतर कारागृहातील सुरक्षा आणि कर्मचाऱ्यांच्या तपासणीचा मुद्दा ऐरणीवर आला असतानाच, पुन्हा दारूची बाटली सापडल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित होत आहे.
कारागृहात कैद्यांवर शिस्तीचे निर्बंध लादणाऱ्या व्यवस्थेतील कर्मचाऱ्यांकडेच प्रतिबंधित वस्तू आढळत असल्यामुळे अंतर्गत तपासणी यंत्रणा कितपत प्रभावी आहे, हा प्रश्न उपस्थित होत आहे. कारागृहातील प्रवेशद्वारवरील तपासणी, कर्मचाऱ्यांची झडती आणि प्रतिबंधित वस्तूंच्या प्रवेशावर नियंत्रण ठेवण्याच्या उपाययोजनांचा फेरआढावा घेण्याची गरज निर्माण झाली आहे.