

नाशिक : विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला केवळ चार दिवस उरले आहेत. त्यामुळे प्रचाराला जोर चढला असून सकाळ - संध्याकाळ विविध प्रभाग पिंजून काढले जात आहेत. नाशिक मध्य विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या अधिकृत उमेदवार प्रा. देवयानी फरांदे यांना सर्वत्र मोठा प्रतिसाद मिळत असून, विक्रमी मताधिक्याने त्या विधानसभेत पोहोचतील यासाठी मतदारांचा आशीर्वाद लाभत आहे.
शनिवारी (दि.१६) सकाळच्या सत्रात प्रभाग क्र. २३ मध्ये दुचाकी रॅली काढण्यात आली. कमळ चिन्हाने सजवलेल्या रथावर उमेदवार प्रा. फरांदे यांच्या समवेत भाजपा नेत्या अनिता भामरे, माजी महापौर सतिश कुलकर्णी, माजी नगरसेवक चंद्रकांत खोडे, यशवंत निकुळे, संध्या कुलकर्णी, शाहीन मिर्झा, उदय जोशी तसेच अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले. तुलसी आय हॉस्पिटलपासून प्रचार फेरीला प्रारंभ झाला. सुवासिनी महिलांनी औक्षण करून शुभेच्छा दिल्या. यावेळी जोरदार घोषणांनी परिसर दणाणून गेला. हॅपी होम कॉलनी, ईडन गार्डन सोसायटी, बजरंगवाडी, आनंदनगर, अशोका मार्ग, हेमराज कॉलनी, सिध्दमुनी सोसायटी, ईश्वर पॅरेडाइज, बोधले नगर, हिरेनगर, गणेशबाबा समाधी स्थान येथे आल्यावर तेथे दर्शन घेऊन आशीर्वाद घेण्यात आले. दि. २० नोव्हेंबर रोजी मतदान केंद्रावर जाऊन प्रत्येक मतदाराने आपले अमूल्य मत द्यावे. प्रा. फरांदे यांना मोठ्या मताधिक्याने तुमचे प्रश्न सोडविण्यासाठी विधानसभेत पाठवावे असे आवाहन नेते, कार्यकर्त्यांनी केले.
कालिका मंदिर परिसरातील माळी समाजाचे युवा नेते संदिप विधाते यांनी नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघातून महायुतीच्या उमेदवार प्रा. देवयानी फरांदे यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. यावेळी असंख्य कार्यकर्त्यांनी त्यांच्यासोबत भाजपचे काम करण्याचा निर्णय घेतला. फरांदे यांच्या प्रचारार्थ सभा घेऊन आपला संपूर्ण पाठिंबा असल्याचे त्यांनी सांगितले.