

देवळाली कॅम्प (नाशिकरोड) : लष्करी हद्दीलगत असलेल्या देशभरातील नऊ कॅन्टोन्मेंट बोर्डांना जवळील महानगरपालिका हद्दीत वर्ग करण्याबाबत प्रक्रिया सुरू असून, याबाबत रक्षा संपदा विभागाने येत्या बुधवार, दि. 8 जानेवारी रोजी दिल्ली येथे संबंधित राज्य सरकारच्या प्रतिनिधींशी चर्चा करण्यासाठी बैठक आयोजित केली आहे. या चर्चेच्या निकालाचा विचार करण्यासाठी रक्षा संपदा भवनात गुरुवार, दि. 9 जानेवारीला बैठक होणार आहे.
भारतीय लष्कराची मध्य कमांड, दक्षिण कमांड व दक्षिण - पश्चिम कमांड व लखनौ, पुणे व जयपूर येथील सदर्न कमांड अंतर्गत असलेल्या देहरादून, क्लेमेंट हाउस, नसिराबाद, अजमेर, बबिना, मथुरा, फत्तेहगड, शहाजहापूर, देवळाली या 9 कॅन्टोन्मेंट बोर्डांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, संबंधित कमांडचे संचालक, रक्षा संपदा भवनमधील अधिकार्यांची संबंधित राज्य सरकारच्या प्रतिनिधींची एकत्रित बैठक होणार आहे. दुसर्या दिवशी या चर्चेवर संरक्षण मंत्रालयाचे संयुक्त सचिव यांच्या अध्यक्षतेखाली या बैठकीच्या निकालाबाबत चर्चा करण्यात येणार असल्याचे संरक्षण मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या पत्रात नमूद करण्यात आले आहे.
दोन वर्षांपूर्वी सीमांकन व हद्द कमी करण्याबाबत ‘नागरी भागाची छाटणी’ या विषयानुसार देशभरातील कॅन्टोन्मेंट बोर्ड शेजारील नगरपालिका किंवा महापालिका क्षेत्रात समावेश करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली होती. कॅन्टोन्मेंट हद्दीतील खासगी मालमत्तांवरील हरकतीही मागविण्यात आल्या होत्या, ती प्रक्रियाही पूर्ण झाली आहे. आता या बैठकीत नेमके काय होणार, याकडे देवळालीसह देशभरातील कॅन्टोन्मेंट बोर्डांमधील नागरिकांचे लक्ष लागले आहे.