

नाशिक : सतीश डोंगरे
पुण्यातील स्वारगेट बसस्थानकातील शिवशाही बसमधील अत्याचार प्रकरणामुळे राज्यभरात खळबळ उडाली असून, बसस्थानकांमधील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर शहरांतील सात बसस्थानकांचा आढावा घेतला असता, अनेक बसस्थानकांमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा अपुरी आहे, तर काही ठिकाणी ती उपलब्धच नाही.
पोलिस चौक्या असल्या तरी पोलिसच उपस्थित नसतात. संपूर्ण बसस्थानकाची जबाबदारी एकट्या-दुकट्या सुरक्षारक्षकावर सोपविली जात असल्याने, प्रवाशांची सुरक्षा वाऱ्यावर असल्याचे वास्तव आहे. राज्य परिवहन महामंडळाने सुरक्षा हा विषय 'प्रवाशांच्या भरवशावर' सोडून दिल्याचे दिसून येते. यातून अप्रिय घटना घडल्यास त्यास जबाबदार कोण? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.
तब्बल १२ कोटी रुपये खर्चून एअरपोर्टच्या धर्तीवर बांधण्यात आलेल्या मेळा बसस्थानकात एकही सीसीटीव्ही कॅमेरा बसविलेला नाही. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या या बसस्थानकात २४ तास प्रवाशांची वर्दळ असते. मात्र, त्यांची सुरक्षा वाऱ्यावर असल्याचे चित्र आहे.
नाशिकच्या ठक्कर, मेळा, नाशिक रोडसह अन्य बसस्थानकांतील पोलिस चौक्यांमध्ये पोलिस हजर नसल्याचे दिसून येते. ठक्कर बसस्थानकातील चौकीच्या काचा काळ्या असल्याने आत कोण आहे, हे कळत नाही. तसेच दरवाजा २४ तास उघडा असतो. बहुतांश वेळा गर्दुल्ल्यांचा तेथे वावर असतो, असे विक्रेते सांगतात. त्यामुळे या चौक्यांचा उपयोग सुरक्षेसाठी की गैरकृत्यासाठी, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
शहरातील बसस्थानकांच्या सुरक्षेसाठी 'मेस्को' एजन्सीमार्फत तीन शिफ्टमध्ये सुरक्षारक्षक तैनात केले जातात. शिफ्ट वेळा सकाळी ८ ते सायं. ४, सायं. ४ ते रात्री १२ आणि रात्री १२ ते सकाळी ८ अशी असून, प्रत्येकवेळी एक-एक सुरक्षारक्षक तैनात असतो. काही ठिकाणी रात्री दोन सुरक्षारक्षक तैनात असतात.
रेल्वे स्टेशनलगत असलेल्या नाशिक रोड बसस्थानकात सीसीटीव्ही बसविले असले तरी, त्यातील काही बंद अवस्थेत आहेत. याशिवाय 'सीसीटीव्हीं'चे मॉनिटरिंग करणारा एलईडी बंद अवस्थेत असल्याने, आरोपींवर नजर ठेवणे अशक्य होत आहे. वास्तविक, नाशिक रोड बसस्थानक संवेदनशील असल्याने, या ठिकाणी सुरक्षेच्या पुरेशा सुविधा असायला हव्यात. मात्र, त्याकडेही साफ दुर्लक्ष झाले आहे.
१८ सीसीटीव्ही पैकी ९ सुरू, ९ बंद.
तीन शिफ्टमध्ये चार सुरक्षारक्षकांची गस्त
पोलिस चौकी नावालाच
बसस्थानकात २५ बसेसचा मुक्काम
एकही सीसीटीव्ही नाही
बसस्थानकात रात्री ३५ बसेसचा मुक्काम
तीन शिफ्टमध्ये प्रत्येकी एक सुरक्षारक्षक
पोलिस चौकी नावालाच
६ सीसीटीव्ही, पण सहा महिन्यांपासून बंद
तीन शिफ्टमध्ये प्रत्येकी एक सुरक्षारक्षक
६० बसेसचा बसस्थानकात मुक्काम
पोलिस चौकी नाही
सातपूर, देवळाली गाव, तपोवन बसस्थानकातही सुरक्षेबाबत परिवहन महामंडळाची अनास्था दिसून येते. या ठिकाणी सीसीटीव्ही तर नाहीतच, शिवाय सुरक्षारक्षकही अधुनमधूनच नजरेस पडतो. पोलिस चौक्या नसल्याने, किमान पोलिसांनी बसस्थानक परिसरात गस्त घालणे अपेक्षित आहे. मात्र, तेदेखील होताना दिसत नाही, असे स्थानिक सांगतात.
महामार्ग बसस्थानकासमोरच मुंबई नाका पोलिस स्टेशन असले तरी तेथे पोलिस गस्त घालत नाहीत, अशी तक्रार विक्रेत्यांची आहे. बसस्थानकात टवाळखोरांचा व गर्दुल्ल्यांचा वावर वाढला असून, यामुळे महिला प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
ठक्कर बाजार
मेळा बसस्थानक
महामार्ग बसस्थानक
तपोवन बसस्थानक
नाशिक रोड बसस्थानक
देवळाली गाव बसस्थानक
सातपूर बसस्थानक
ठक्कर बाजार बसस्थानकातील एका कॅन्टीनवाल्याला बसस्थानकाच्या सुरक्षेबाबत विचारले असता, मी वर्षभरापासून येथे सकाळी ८ ते सायंकाळी ५ पर्यंत काम करतोय. मात्र, या काळात एकदाही पोलिस चौकीत पोलिसास बघितले नसल्याचे सांगितले.
स्वारगेटमधील बंद शिवशाही बसमध्ये तरुणीवर अत्याचाराची घटना घडली. मेळा बसस्थानकात शिवनेरी बस काही दिवसांपासून बंद अवस्थेत उभी आहे. सुरक्षारक्षकांचे दुर्लक्ष आणि सीसीटीव्हीच्या अभावामुळे ही बस गर्दुल्ल्यांसाठी आसरा बनली आहे.
निम्मे सीसीटीव्ही बंद असून, ते सुरू करण्याबाबत वरिष्ठ कार्यालयाकडे पत्रव्यवहार केला आहे. लवकरच सीसीटीव्हीचे काम सुरू होईल. सुरक्षारक्षकांची संख्या कमी आहे. ती वाढविण्याची गरज आहे.
सतीश हिप्पर, बसस्थानकप्रमुख, ठक्कर बाजार, नाशिक
बसस्थानकात पोलिस चौकी आहे. मात्र, त्या ठिकाणी पोलिस नसतात. अधुनमधून त्यांच्याकडून सुरक्षेबाबतचा आढावा घेतला जातो. सीसीटीव्ही बसविण्याचे काम लवकरच सुरू होईल.
प्रकाश महाजन, बसस्थानकप्रमुख, मेळा बसस्थानक, नाशिक.
बसस्थानकात पाच ते सहा सीसीटीव्ही आहेत. मात्र, मागील काही काळापासून ते बंद अवस्थेत आहेत. लवकरच ते सुरू करण्याचे काम हाती घेतले जाईल. पोलिसांची गस्त सुरू असते.
विनायक ठिपणे, बसस्थानकप्रमुख, महामार्ग, नाशिक.
आगारात उभ्या बसेवर लक्ष ठेवण्याची आमच्याकडे जबाबदारी आहे. याशिवाय बसस्थानकात येणारी वाहने ठरावीक ठिकाणी उभे करण्याची आम्ही सूचना देतो. टवाळखोरांचा जाच नाही. एकदा टवाळखोरांनी गोंधळ घातला होता. मात्र, त्यांना हुसकावून लावले होते.
प्रमोद महाजन, सुरक्षारक्षक, मेळा बसस्थानक, नाशिक.
शिफ्टप्रमाणे कामकाज चालत असून, बसस्थानकात येणाऱ्या - जाणाऱ्या वाहनांना ठरावीक ठिकाणी पार्किंग करण्यास सांगितले जाते. टवाळखोरांचा जाच झाल्यास लगेचच आम्ही पोलिसांची मदत घेतो. सीसीटीव्ही बंद असल्याने, ते लवकरच सुरू करायला हवेत.
प्रदीप निंबाळकर, सुरक्षारक्षक, महामार्ग बसस्थानक, नाशिक.