

देवळा : तालुक्यातील मेशीशीफाटा येथील घरफोडी प्रकरणी पोलिसांनी शुक्रवारी (दि.९) एकाला ताब्यात घेतले. त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याच्या ताब्यातील रक्कम पोलिसांनी जप्त केली आहे. गणेश बापू शिंदे असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, तालुक्यातील मेशी फाटा येथील सोनाली रवींद्र सोनवणे (वय ३३) यांचे बंद घर अज्ञात चोरट्याने शुक्रवारी फोडून ७० हजाराची रक्कम चोरून नेली होती. याप्रकरणी सोनवणे यांनी देवळा पोलिसांत तक्रार दाखल दिली होती. त्यानंतर देवळा पोलीस निरीक्षक सार्थक नेहते व कळवण उपविभागीय पोलीस अधिकारी किरणकुमार सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली देवळा पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन श्वान पथकाला प्राचारण करीत तपास कार्य सुरू केले. श्वान पथकाने घटनास्थळापासून मेशी फाटा परिसरात राहणाऱ्या गणेश बापू शिंदे यांच्या घरापर्यंत माग दाखविल्याने पोलिसांनी संशयित आरोपी गणेश शिंदे याला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता त्याने चोरी केल्याची कबुली दिली.
ही कारवाई देवळा पोलिस निरीक्षक सार्थक नेहते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक दामोदर काळे, पोलीस हवालदार भास्कर सोनवणे, इंद्रजीत बर्डे, नितीन बाराहाते, पोलीस नाईक संजय मोरे, पोलिस अंमलदार संदीप चौधरी, श्रावण शिंदे यांनी केली.