

नाशिक : त्र्यंबकेश्वर नगरपरिषदेचे नगररचना सहायक आणि बांधकाम विभागातील सफाई कामगारास १० हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली.
तक्रारदाराकडे यासाठी २५ हजारांची लाच मागितली होती. याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. याबाबत पडताळणी करत २६ नोव्हेंबरला सापळा रचण्यात आला. सायंकाळी पावणेसहाला सहायक रचनाकार मयूर शाम चौधरी (३१) आणि सफाई कामगार अमोल विलास दोंदे (४५) यांना १० हजार रुपयांची लाच घेतांना रंगेहात पकडण्यात आले.
या प्रकाराने त्र्यंबकेश्वर येथे खळबळ उडाली आहे. ताब्यात घेतलेले लाचखोर संशयितांना पोलिस कोठडी देण्यात आली आहे. त्र्यंबकेश्वरला शहर विकास योजनोतील आरक्षित भूखंडावर अवैध बांधकामे होत आहेत. मोक्याचे भूखंडावर बांधकाम करण्यात येत असताना नगररचना विभागाने दुर्लक्ष केले आहे. याबाबत संबंधित विभागाने केलेले दुर्लक्ष अर्थपूर्ण असल्याची चर्चा आता होत आहे.