

नाशिक : शेतात पीएम कृषी योजनेतंर्गत ३ एचपी सोलर बसवण्याचे सर्व्हेक्षण करून त्याचा अहवाल वरिष्ठांना पाठवण्याच्या मोबदल्यात तक्रारदाराकडून एक हजार रुपयांची लाच घेणाऱ्या त्र्यंबकेश्वर येथील महावितरणच्या वरिष्ठ तंत्रज्ञास रंगेहाथ पकडले आहे. प्रविण जगन्नाथ सूर्यवंशी असे संशयिताचे नाव आहे.
तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केलेल्या तक्रारीनुसार, त्यांच्या वडिलांच्या शेतात शासकीय योजनेतंर्गत ३ एचपी सोलर बसवायचे होते. त्यासाठी सर्व्हे करून महावितरण अॅप वरून वरिष्ठांना अहवाल सादर करण्याच्या मोबदल्यात सूर्यवंशी याने तक्रारदाराकडे दीड हजार रुपयांची लाच मागितली. त्यानुसार विभागाने तक्रारीची शहानिशा करून सापळा रचला. सोमवारी (दि. ९) त्र्यंबकेश्वर येथील महावितरणच्या कार्यालयात तडजोड करून सूर्यवंशी याने तक्रारदाराकडून १ हजार रुपयांची लाच घेतली. त्यावेळी विभागाने लाचेची रक्कम स्विकारताना सूर्यवंशी यास रंगेहाथ पकडले. त्याच्याविरोधात त्र्यंबकेश्वर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.