

नाशिक : पुनर्निरीक्षण दाव्याचा निकाल पक्षकाराच्या बाजूने लावून देण्याचे व निकाल जाणीवपूर्वक उशिरा अपलोड करीत ३० हजार रुपयांची लाच मागणाऱ्या विभागीय महसूल कार्यालयातील महसूल सहायकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले. कैलास पाराजी वैरागे (५१, रा. शिवदर्शन सोसायटी, नाशिक राेड) असे संशयित लाचखोराचे नाव आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागात वकिलाने वैरागेविरोधात तक्रार दिली होती. तक्रारदार वकिलाच्या पक्षकाराच्या बाजूने पुनर्निरीक्षणाचा निकाल देण्याच्या मोबदल्यात ३० हजार रुपयांची लाच मागितली होती. त्यासाठी संशयित वैरागेने निकाल जाणीवपूर्वक उशीरा अपलोड केला होता. तसेच दि. २९ व ३१ ऑगस्ट तसेच ६ सप्टेंबरला तक्रारदाराकडे ३० हजार रुपयांची लाच मागितली होती. तक्रारीत तथ्य आढळल्याने विभागाने सापळा रचला होता. मात्र, वैरागेने लाचेची रक्कम स्वीकारली नाही. त्यामुळे नाशिक रोड पोलिस ठाण्यात वैरागेविरोधात लाचेची मागणी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक अनिल बडगुजर, हवालदार दीपक पवार, संदीप हांडगे, संजय ठाकरे, विनोद पवार यांच्या पथकाने ही कारवाई केली.