

नाशिक : भंगार चोरीतील गुन्ह्यातून सुटका करण्यासाठी ५० हजार रुपयांच्या लाचेची मागणी करुन पाच हजार रुपये घेण्यास तयार झालेल्या शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट दोनच्या सहायक पोलिस उपनिरीक्षकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) ताब्यात घेतले आहे. राजेंद्र सोपान घुमरे (५६, रा. गणेशनगर, द्वारका) असे संशयिताचे नाव आहे. एसीबीने शुक्रवारी (दि.२७) ही कारवाई केली.
अंबड औद्योगिक वसाहतीत ३७ वर्षीय भंगार व्यावसायिक तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे घुमरेंविरोधात तक्रार दिली होती. त्यानुसार ९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास संशयिताने लाच घेण्याची तयारी दर्शविल्याची तक्रार व्यावसायिकाने दिली. एसीबीच्या अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तक्रारीची शहानिशा करून सापळा रचला. ५० हजार रुपयांहून तडजोड करून ५ हजार रुपयांची लाच घेण्यास घुमरे तयार झाले. मात्र लाचेची रक्कम स्विकारत नव्हता. त्यामुळे पथकाने घुमरेंविरोधात अंबड पोलिसांत लाचेची मागणी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.