Nashik Black Magic Fraud | नाशिकमध्ये आणखी एका भोंदूचा कारनामा उघड, जळत्या चितेवर आघोरी पूजा!

कमलेश महाराज अधिकारी या भोंदूसह त्याची पत्नी गौरी अधिकारी यांच्यावर अंनिसच्या प्रयत्नातून हा गुन्हा दाखल
Black Magic Fraud
Black Magic FraudPudhari File Photo
Published on
Updated on

नाशिक : शहरासह इतर ठिकाणी आश्रम, मठ स्थापन करीत विविध समस्यांनी पीडित व्यक्तींचे स्मशानात अघोरी पूजाविधी, दैवी तोडगे, अंधश्रद्धायुक्त उपाय करीत विविध प्रकारचे शोषण केल्याप्रकरणी कमलेश महाराज अधिकारी या भोंदूसह त्याची पत्नी गौरी अधिकारी यांच्या विरोधात इंदिरानगर पोलिसांमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. अंनिसच्या प्रयत्नातून हा गुन्हा दाखल झाला आहे.

दाखल फिर्यादीनुसार सोलापूर जिल्ह्यातील लऊळ येथील मदन नवनाथ देवकर व ज्ञानेश्वर नवनाथ देवकर यांच्या आई- वडिलांचे २०२१ मध्ये महिनाभराच्या अंतराने निधन झाले. त्यामुळे ते दोघे भाऊ भीतीमध्ये आयुष्य जगत होते. उपाय म्हणून दैवी तोडगे, उपाय करणाऱ्यांचा शोध घेतला. त्यांना यू-ट्यूबवर नाशिकच्या पाथर्डी फाटाजवळील खंडोबानगर येथील भोंदूबाबा कमलेश अधिकारी याची माहिती मिळाली होती.

नाशिकला येऊन ते या भोंदूला भेटले. कुटुंबाचे मागच्या जन्मीचे पाप आहे. ते राहात असलेल्या जमिनीत दैवी दोष आहे. त्या जमिनीत गुप्तधनाच्या साठ्यावरील अतृप्त आत्म्यांनी आई-वडिलांचा बळी घेतला. तुमचाही लवकरच मृत्यूयोग आहे अशी भीती घातली. भोंदूबाबाने दैवी उपचार करण्याच्या बहाण्याने त्यांच्या मनाचा ताबा मिळवला. दोन्ही भावांना भूलथापा मारत उज्जैनला बोलावले. तिथे स्मशानभूमीत जळत्या चितेवर चार दिवस अघोरी पूजा करत विविध पशूंचा बळी दिला. पूजेसाठी दीड लाख रुपये उकळले. काही दिवसांनंतर पिंपळखेड (ता. नांदगाव) येथील आश्रमात अघोरी पूजा केली. त्यात विविध पशूंचा बळी दिला. प्रसाद म्हणून दारू दिली.

त्यानंतर त्र्यंबकेश्वर येथील आश्रमात बळजबरीने ठेवून घेत घरगुती कामे करून घेतली. त्यांना लालूच, भीती दाखवत विविध प्रकारे शोषण केले. मठ बांधण्याच्या नावाखाली त्यांची दोन एकर जमीन परस्पर नावावर करून घेतली. विशेष म्हणजे भोंदूबाबा कमलेश महाराज अधिकारी याच्या भोंदूगिरीत त्याच्या पत्नीचाही सहभाग असल्याचे समोर आले. सोलापूरच्या या पीडितांनी अंनिसच्या कार्यकर्त्यांशी संपर्क साधल्यावर हा प्रकार समोर आला.

कार्यकर्त्यांनी पीडितांना घेऊन इंदिरानगर पोलिस ठाणे गाठले. प्रभारी पोलिस निरीक्षक मनोहर कारंडे यांना पीडितांनी आपबिती ऐकवली. त्यानंतर कारंडे यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेत भोंदू कमलेश अधिकारी, त्याच्या पत्नी विरोधात जादूटोणाविरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. यासाठी अंनिसचे डॉ. टी. आर. गोराणे, कृष्णा चांदगुडे, ॲड. बाबासाहेब नन्नावरे, अनुप खैरनार, महेंद्र दातरंगे, रंजन लोंढे, ॲड. सुशीलकुमार इंदवे यांनी पीडितांना धीर देत त्यांना पोलिसांपर्यंत पोहोचवले. या गुन्ह्याचा तपास सहायक पोलिस उपनिरीक्षक युवराज शिरसाठ करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news