

नाशिक : आयारामांच्या प्रवेशावरून निष्ठावंतांनी घातलेला राडा, एबी फॉर्म वाटपावेळी झालेली पळवापळवी आणि प्रभाग २५ व २९ मधील एबी फॉर्मवरून झालेल्या प्रकरणात झालेली पक्षाची नाचक्की या सर्व प्रकाराची प्रदेशस्तरीय चौकशी करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिले आहेत.
उमेदवारी न मिळाल्याने नाराज असलेल्या पक्षातील निष्ठावंतांची नाराजी दूर करण्यात पक्षाला यश येईल, असा दावा देखील महाजन यांनी केला आहे. उमेदवारी निश्चितीवरून झालेल्या नाराजी नाट्यानंतर डॅमेज कंट्रोलसाठी गेल्या दोन दिवसापासून मंत्री महाजन नाशिक दौऱ्यावर आहेत. महाजन यांनी शनिवारी माध्यमांशी संवाद साधत भाजपमधील राडा प्रकरणावर सारवासारव केली. ते म्हणाले की, जवळपास ११० एबी फॉर्मचे सुरळीत वाटप झाले होते.
मी फॉर्म वाटपवेळी तिथे नव्हतो, तीन चार प्रभागवेळी गोंधळ झाला. दोन चार कार्यकर्त्यांवर अन्याय झाला. पळापळीत काही एबी फॉर्म गहाळ झाले असावेत, असेही महाजन यांनी सांगितले. प्रभाग २५ आणि २९ मध्ये एबी फॉर्मच्या वाटपावरुन झालेल्या गोंधळात सुधाकर बडगुजर यांच्याकडे ४ एबी फॉर्म कसे आले, कोणाला कुठून माघार घेण्याच्या सूचना देण्यात आल्या, कोण कुठल्या प्रभागातून निवडणूक लढवणार होते, याबाबत मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षांच्या निर्देशानुसार सखोल चौकशी करण्यात येणार असल्याचे महाजन यांनी सांगितले. तिकीट वाटपात पैसे घेतल्याचे आरोपही महाजन यांनी फेटाळून लावले आहेत.
प्रत्येक निवडणुकीत असे आरोप होत असतात, ज्यांना उमेदवारी मिळाली नाही किंवा नाराज झालेले आरोप करतात असे सांगत तिकीट वाटपात पैसे घेतल्याचे आरोप निराधार असल्याचे महाजन यांनी स्पष्ट केले. महापौर भाजपचाच होणार भाजप हा पक्ष कार्यकर्ता बेस पक्ष असल्याने पुढचा महापौर भाजपचाच होणार असल्याचा दावाही महाजन यांनी केला. सर्व निवडणुकींत दोन तीन दिवस नाराजी असते असे सांगत, मी सगळ्यांशी बोललो आहे. काही नाराज मला भेटूनही गेले आहेत.
दोन तीन दिवसात नाराजी दूर होईल. आम्ही एकदिलाने कामाला लागू असा दावाही महाजन यांनी केला. ठाकरेंची मुलाखत हास्यास्पद उवाठाचे खासदार संजय राऊत आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची मुलाखत ही हास्यास्पद असल्याचीही टीका महाजन यांनी केली. राऊत यांच्या पक्षाकडे निवडणूक लढवण्यासाठी उमेदवारच उरलेले नाहीत. त्यामुळेच भाजपचे उमेदवार बिनविरोध निवडून येत असताना विरोधकांना पोटशूळ उठला आहे, असा टोला महाजन यांनी लगावला.