

नाशिक : शहरात दुचाकी चोरीचे सत्र सुरूच असून, चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यात पोलिस सपशेल अपयशी ठरत असल्याचे दिसून येत आहे. शहरात दररोज किमान तीन किंवा त्याहून अधिक दुचाकी चोरीला जात आहेत. त्यात आणखी तीन दुचाकींची भर पडली असून, पोलिस दप्तरी 'अज्ञात चोरटे' अशीच नोंद असल्याने, चोरट्यांची ओळख पटविणेही पोलिसांना अवघड होत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे 'दुचाकी चोर जोमात, पोलिस कोमात' असे म्हणण्याची वेळ आता नागरिकांवर आली आहे.
दुचाकी चोरीच्या घटना दररोज समोर येेत असूनही पोलिसांकडून चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी कोणतीच मोहीम राबविली जात नाही. त्यामुळे चोरांकडून दररोज दुचाकी लंपास केल्या जात आहेत. म्हसरूळ शिवारातील लभडे वस्ती येथे केशव उत्तम लभडे (७१, रा. लभडे वस्ती, पाटाजवळ, भारंबेनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, गुरुवारी (दि. ५) रात्री ११.३० च्या सुमारास घराच्या पार्किंगमधून अज्ञात चोरट्यांनी दुचाकी लंपास केली. विशेष म्हणजे फिर्यादी यांनी दुचाकी हँडल लॉक केली होती. असे असतानाही चोरट्यांनी मोठ्या शिताफीने लॉक तोडून दुचाकी घराच्या पार्किंगमधून लंपास केली. दुसऱ्या घटनेत एन. डी. पटेल रोड, बीएसएनएल ऑफिसजवळील शिवदर्शन सोसायटी येथून दुचाकी चोरून नेली. याप्रकरणी अजय बाळू गांगुर्डे यांनी फिर्याद दिली. या दोन्ही घटनांमध्ये पोलिसांना अद्यापपर्यंत चोरट्यांचा शोध लागलेला नाही. दरम्यान, दुचाकी चोरीच्या वाढत्या घटना रोखण्यासाठी पोलिसांनी मोहीम हाती घ्यावी, अशी मागणी नाशिककरांकडून केली जात आहे.