लासलगाव : पिंपळस ते येवला व लासलगाव- विंचूर- खेडलेझुंगे या रस्त्यांच्या कामांचे शनिवारी (दि. १४) सायंकाळी ५ वाजता विंचूर चौफुली येथे मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते भूमिपूजन होणार आहे. यावेळी अध्यक्षस्थानी माजी खासदार समीर भुजबळ असणार आहेत. पिंपळस ते येवला या मार्गाच्या काँक्रिटीकरणासाठी ५६० तर लासलगाव- विंचूर- खेडलेझुंगे या मार्गाच्या काँक्रिटीकरणासाठी १३४ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे येवला विधानसभा अध्यक्ष वसंत पवार यांनी दिली आहे.
मंत्री छगन भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नांतून आशियाई विकास बँक प्रकल्पातील पिंपळस ते येवला चौपदरी रस्त्याचे कॉंक्रिटीकरण करण्यात येणार आहे तर महाराष्ट्र राज्य पायाभूत विकास महामंडळाच्या अंतर्गत लासलगाव ते विंचुर चौपदरी रस्ता आणि म्हसोबा माथा- धारणगाव- सारोळे- खेडलेझुंगे या रस्त्याचे कॉंक्रिटीकरण होणार आहे.
मंत्री भुजबळ यांच्या माध्यमातून नाशिक ते येवला या रस्त्याचे चौपदरीकरण करण्यात आले होते. त्यानंतर गेल्या काही वर्षांपासून या रस्त्यावर प्रचंड खड्डे निर्माण झाल्याने अपघात वाढले होते. त्यामुळे या रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी भुजबळ यांच्याकडे करण्यात आली होती. त्यांनी केलेल्या पाठपुराव्यानुसार आशियाई विकास बँक अर्थसहाय्यीत महाराष्ट्र रस्ते सुधारणा प्रकल्पांतर्गत या रस्त्याची सुधारणा करण्यास मंजुरी मिळाली असून या रस्त्यासाठी ५६० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. लासलगाव-विंचूर या मार्गावर वाहनांची मोठी वर्दळ असते. त्यातच लासलगाव येथील बाजार समितीमुळे अवजड वाहने अधिक असल्याने लासलगाव ते विंचूर हा ९.६०० किलोमिटर रस्त्याचे चौपदरीकरण व म्हसोबा माथा- धारणगाव- सारोळे ते खेडलेझुंगे या १४.१०० किलोमिटर लांबीच्या रस्त्याचे कॉंक्रिटीकरण करण्यासाठी १३४ कोटीचा निधी मंजूर करण्यात आला आहे. लासलगाव येथून सिन्नर व शिर्डीकडे जाणारा बोकडदरा- खेडलेझुंगे रस्त्याची रुंदी ५.५ मीटर वरून ७ मीटर होणार असल्याने या रस्त्यावरील दळणवळण अधिक सुलभ होण्यास मदत मिळणार आहे.