नाशिक : खबरदार ! दारु पिऊन आल्यास मिळेल 'चोप'; महिला समिती शिकविणार धडा

Nashik : धोंडाळपाडा ग्रामपंचायतीचा जालीम ठराव; महिला समिती शिकविणार धडा
धोंडाळपाडा ग्रामपंचायत, दिंडोरी
दिंडोरी : धोंडाळपाडा येथील महिला ग्रामसभेत सरपंच लता गायकवाड, पोलिसपाटील भारती हिंडे यांच्यासह महिला.(छाया : अशोक निकम)
Published on
Updated on

दिंडोरी : गेल्या काही वर्षांत ग्रामीण भागात व्यसनाधिनतेचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून, अल्पवयीन मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत अनेक जण विविध प्रकारच्या नशेच्या आहारी गेल्याचे चित्र आहे. यातून गावात दररोज कुणाच्या ना कुणाच्या घरी भांडण-तंटा ठरलेलाच आहे. इतकेच नव्हे, तर हे लोक गावात कुणाचे लग्न, सप्ताह, गणेशोत्सव अशा विविध सणा-वाराला नशा करून धिंगाणा घालतात. त्यामुळे गावातील शांतता भंग होऊन गावगाडा विस्कळीत होत आहे.

Summary

महिलांची 'चोप' समिती

नशेखोरांना अद्दल घडविण्यासाठी दिंडोरी तालुक्यातील धोंडाळपाडा ग्रामपंचायतीने जालीम उपाय शोधला असून, नशा करून मर्यादेचे उल्लंघन करणाऱ्यास चांगला चाेप देण्याचा ठराव महिला ग्रामसभेत संमत केला आहे. विशेष म्हणजे यासाठी महिलांची 'चोप' समिती तयार करण्यात आली आहे.

धोंडाळपाडा ग्रामपंचायतीची ग्रामसभा सरपंच लता गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली गुरूवारी (दि.26) रोजी झाली. यावेळी ग्रामसभेत गावातील मद्यपी, व्यसनाधिनांमुळे त्यांच्या कुटुंबासह ग्रामस्थांना होणाऱ्या त्रासाचा विषय चर्चेला आला. यात गावातील तरुणांबरोबरच, शाळकरी मुले, ज्येष्ठांपर्यंत अनेक जण मद्यपान, चरस, गांजा अशा व्यसनांच्या आहारी गेल्याचे लक्षात आले. यातून अनेकांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत, तर तरुणांना लग्नासाठी मुली मिळणे कठीण झाले आहे. ही परिस्थिती सुधारण्यासाठी ठोस उपाय करण्याची मागणी झाली. अखेर याबाबत चर्चेअंती भविष्यात गावगाडा सुरळीत चालावा तसेच व्यसनाधिनतेला आळा बसावा यासाठी अशा नशेखोरांना धडा शिकविण्याचा ठराव ग्रामपंचायतीने संमत केला. यात गावामध्ये नशा करून कुटुंबाला तसेच ग्रामस्थांना त्रास देणाऱ्यास चोप देण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी गावातीलच खमक्या महिलांची समिती स्थापन करण्यात आली असून, जे युवक व्यसन करून त्रास देतील, त्यांना ही समिती धडा शिकविणार आहे. ग्रामसभेला उपसरपंच मधुकर हिंडे, ग्रामसेवक विजय पवार यांच्यासह सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.

महिला 'चोप' कमिटीमध्ये यांचा समावेश

अध्यक्षपदी कविता गहिले, उपाध्यक्षपदी भारती पाडवी, सचिव चंद्रकला हिंडे, तर सदस्यपदी सावित्रा हिंडे, उषा हिंडे, कांता गहिले, अनसूया हिंडे, जना गहिले, हिरा हिंडे, सरला गायकवाड, अनसूया वाघमारे, मंजुळा गहिले, शांता वाघमारे, यशोदा पवार, लता हाडस, मालती गहिले, यमुना गहिले, जना वाघमारे, लक्ष्मी गहिले, पोलिसपाटील भारती हिंडे यांचा समावेश आहे.

मद्यपींमुळे गाव भंगण्याच्या मार्गावर आहे. शांततेच्या मार्गाने तळीराम ऐकत नाहीत. त्यामुळे आता चोप देऊन नियमानुसार पोलिसांच्या ताब्यात देणे हा उपाय पुढे आला आहे. या निर्णयामुळे व्यसनाधिनतेला नक्कीच आळा बसेल.

लता गायकवाड, सरपंच, धोंडाळपाडा, नाशिक.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news