

नाशिक : अवकाळी पावसामुळे महावितरणची पूर्णत: पोलखोल झाली असून, अत्यंत गलथान कारभारामुळे अंबड, सातपूर, सिन्नर व गोंदे औद्योगिक वसाहतीत तासनतास बत्ती गुल झाल्याने, तब्बल शंभर कोटींचा फटका उद्योगांना बसल्याचा आरोप उद्योजकांनी केला. महावितरणच्या अधिकाऱ्यांना जाब विचारत कामे तत्काळ मार्गी लावण्यास सांगितले. यावेळी पंधरा दिवसात वीज पुरवठा सुरळीत करणार असल्याचे आश्वासन कार्यकारी अभियंता चेतन वाडे यांनी दिले.
अंबडला आयमा रिक्रिएशन सभागृहात आयोजित बैठकीत बीओटी चेअरमन ज्ञानेश्वर गोपाळे आणि धनंजय बेळे यांनी महावितरण अधिकाऱ्यांना धारेवर धरले. यावेळी उपस्थित उद्योजकांनी अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती केली. मागील काही दिवसांपासून वारंवार वीज पुरवठा खंडीत होत असल्याने, उद्योजकांचे मोठे नुकसान होत आहेत. एके दिवशी सातपूर येथे १८ तास तर अंबड परिसरात दहा तास बत्ती गुल होती. वीज पुरवठ्याबाबत महावितरणकडे तक्रारी केल्यास, त्याची दखल घेतली जात नाही. उद्योजकांच्या नुकसानीस जबाबदार कोण? असा सवाल करीत महावितरण अधिकाऱ्यांना कोंडीत पकडले.
उद्योजक जयप्रकाश जोशी यांनी अत्यंत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करीत, वीजेच्या लंपडावामुळे निर्यातीवर मोठा परिणाम होत असल्याचे सांगितले. उद्योजकांच्या संतप्त प्रतिक्रियेनंतर कार्यकारी अभियंता वाडे यांनी येत्या १५ दिवसात कामांचा निपटारा केला जाणार असल्याचे ग्वाही दिली. बैठकीस महावितरणचे अधिकारी ललित पाटील, ए. व्ही. नागरे, के. बी. जगताप, आर. बी. भांबर, एच. एच. चौरे, अंबड व सातपूरचे सहाय्यक अभियंता गणेश कुशारे व हरिश जोगळेकर यांनी चर्चेत सहभाग घेतला. बैठकीस आयमाचे माजी अध्यक्ष निखिल पांचाळ सहसचिव हर्षद बेळे, मनीष रावल, ऊर्जा कमिटी चेअरमन रवींद्र झोपे, माधुरी सोमवंशी किर्ती शिंदे, विनोद पाटील आदी उपस्थित होते.
अंबडमध्ये बसविण्यात आलेल्या १३२ फिडरचा वाईट अनुभव येत आहे. या फिडरवर डबल केबलसाठी अनेकदा विनंती करूनही त्यास प्रतिसाद दिला गेला नसल्याने, कोट्यावधींचे नुकसान होत असल्याचे आयमा उपाध्यक्ष राजेंद्र पानसरे यांनी सांगितले.
औद्योगिक वसाहतीत गुणवत्तापूर्ण वीजेचा पुरवठा करावा.
प्रत्येक फिडरच्या मेन्टनन्स, ऑडिटबाबतची माहिती उद्योजकांना द्यावी.
खुल्या डीपी सुरक्षित कराव्यात, तंत्रज्ञान अद्ययावत करावे.
शटडाऊन करायचे झाल्यास, त्याची पूर्वकल्पना देणारे संदेश पाठवावेत. तंत्रज्ञान अपग्रेड करावे
पावसाळ्यापुर्वी झाडांची छाटणी करावी, पालपाचोळा त्वरीत उचलावा.
वायरिंगची नियमित देखभाल केली जावी.
उद्योजकांना प्रतिसाद न देणाऱ्या अधिकाऱ्यांना तत्काळ निलंबित करावे.